मनोरंजन

irsal movie : ‘इलेक्शन म्हणजे समदा डाकू लोकांचा खेळ असतोय’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

निवडणुका आणि राजकारणातल्या साजूक मुखवट्या मागचं भयाण वास्तव दाखवणाऱ्या इर्सल (irsal movie) या मराठी चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर लॉन्च करण्यात आला. इर्सल भलरी प्रोडक्शनची निर्मिती आणि राज फिल्मची प्रस्तूती आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिकेत बोंद्रे – विश्वास सुतार यांनी केले आहे. हा मराठी चित्रपट त्याच्या हटके नावामुळे आणि लक्षवेधी पोस्टरमुळे सध्या चर्चेत आहे. लॉन्च झालेल्या ट्रेलर वरून हा चित्रपट राजकारणातील कावेबाज माणसांच्या इर्षेची धूळवड दाखवणार असल्याचे दिसते. (irsal movie)

चित्रपटात डॉ. मोहन आगाशे, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुजाता मोगल, अभिनेत्री माधुरी पवार, शरद जाधव, अजिंक्य निकम, विश्वास सुतार, संजय मोहिते, आदर्श गायकवाड, दिग्विजय कालेकर, सुधीर फडतरे, ओंकार भस्मे, केतन विसाळ, हर्षाली रोडगे, नागेश नाईक, आकाश भिकुले, वैशाली घोरपडे, चैताली बर्डे, अप्पासाहेब कुंडले, सर्जेराव जाधव, हनिफ शेख या कलाकारांच्या भूमिका आहेत. तर ट्रेलर आणि गाण्यांमधून लक्ष्यवेधून घेणारी विक्रम सूर्यकांत आणि शिवानी मोझे पाटील ही फ्रेश जोडी पदार्पण करत आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये राजकारणामधील खालच्या फळीत घडामोडी दिसतात. स्थानिक राजकारण आणि विविध समाजघटकांवर या राजकीय घडामोडींचा होणारा परिणाम यांची झलक या पहायला मिळते. अगदी अल्पवयीन मुलांपासून राजकारणातील बुजुर्ग नेत्यांपर्यंत निवडणूक काळात नेमकं काय काय घडतं हे या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे दिसते.

'इलेक्शन म्हणजे समदा डाकू लोकांचा खेळ असतोय', 'इथला भाय कोणचं नाय', 'नाद केला ना तर बाद करीन' किंवा 'एकदा पाखरू उडालं ना की त्याचा नाद सोडून द्यायचा', तिकीट, पक्ष असल्या कुबड्या बांडगुळांनाचं लागतात' असे संवाद प्रेक्षकांवर छाप सोडतात. त्यामुळे या चित्रपटात आणखी काय काय पाहायला मिळेल? याबद्दल प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्सुक्ता निर्माण झाली आहे.

अनिकेत बोंद्रे – विश्वास सुतार दिग्दर्शित 'इर्सल'चे निर्माते विनायक आनंदराव माने व प्रस्तुतकर्ता सूरज डेंगळे आहेत. 'नाद करायचा नाय' फेम संगीतकार दिनकर शिर्के गीत – संगीतकार आहेत. चित्रपटातील गीते उर्मिला धनगर, पूरण शिवा, गुल सक्सेना, शाहीर लक्ष्मण पवार यांनी गायली आहेत. तर नृत्य दिग्दर्शक धैर्यशील उत्तेकर आहेत. कथा अनिकेत बोंद्रे यांची असून, पटकथा अनिकेत बोंद्रे व महेशकुमार मुंजाळे यांची, तर संवाद विश्वास सुतार यांचे आहेत. छायांकन आनंद पांडे व वीरधवल पाटील यांनी केले आहे. बहुचर्चित 'इर्सल' हा मराठी चित्रपट येत्या ३ जून, २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT