सोलापूर : ग्रामीणच्या 400 पोलिसांच्या होणार बदल्या | पुढारी

सोलापूर : ग्रामीणच्या 400 पोलिसांच्या होणार बदल्या

सोलापूर :  पुढारी वृत्तसेवा : एकाच पोलिस ठाण्यात 5 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कर्मचार्‍यांच्या व ज्या कर्मचार्‍यांनी विनंती अर्ज केले आहेत अशांच्या ग्रामीण मुख्यालयातील 400 पोलिसांच्या येत्या 4 ते 5 दिवसांत अंतर्गत बदल्या करण्यात येणार आहेत. या बदल्यांमध्ये पारदर्शीपणा ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.

पोलिस अधीक्षक सातपुते यांनी प्रत्येक कर्मचार्‍यांची समक्ष भेटून व नक्की कोणत्या कारणासाठी बदली पाहिजे याविषयी त्या कर्मचार्‍यांचे मत जाणून घेत आहेत. तसेच पोलिस कर्मचार्‍यांच्या अडचणी समजावून घेत आहेत. यात रिक्त जागा व विनंती अर्जाचा विचार करून बदली प्रक्रिया पार पाडत आहेत.

ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या अंतर्गत जिल्ह्यात 25 पोलिस ठाणी आहेत. यामध्ये अडीच हजारांपेक्षा जास्त पोलिसांची संख्या आहे. यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल ते सहायक फौजदार या पदावर कार्यरत असलेल्या 400 पोलिसांच्या बदल्या होणार आहेत.
पोलिस आयुक्तालयातील पोलिसांच्या बदल्या झाल्यानंतर ग्रामीण पोलिस मुख्यालयातील 400 पोलिसांच्या बदल्याची प्रक्रिया ही जोरात सुरू आहे.

‘त्या’ पोलिसांना मुख्यालयाचा रस्ता

ग्रामीण पोलिस मुख्यालयातील बदली प्रक्रियेत, ज्या पोलिस कर्मचार्‍यांबाबत तक्रारी आहेत. किंवा एखाद्या प्रकरणात एखाद्या पोलिसांची चौकशी सुरू आहे. या व अशा पोलिस कर्मचार्‍यांची थेट पोलिस मुख्यालयात रवानगी करण्यात येणार आहे. तसेच तपासकामात चुकारपणा करणार्‍या पोलिसांना सुध्दा पोलिस मुख्यालयाची वाट दाखविण्यात येणार आहे.

Back to top button