मनोरंजन

महाराष्ट्राची हास्यजत्रा : खळखळून हसत करू या नव्या वर्षाचं स्वागत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

वर्षभर अवघ्या महाराष्ट्राला हसवणारी हास्यजत्रा नव्या वर्षाचं स्वागतही प्रेक्षकांच्या मनोरंजनी करणार आहेत. 'महाराष्‍ट्राची हास्‍यजत्रा' न्यू इयर स्पेशल कार्यक्रम प्रेक्षकांना ३१ डिसेंबरला रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव, नागपूर इथं या कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्यात आलं.

हास्यजत्रेच्या कलाकारांना बघण्‍यासाठी नागपूरकरांनी चांगलीच गर्दी केली होती. 'ही गर्दी नाय, नागपूरकरांचं प्रेम हाय', असं अभिवादन प्राजक्‍ता माळी हिनी खास वऱ्हाडी शैलीत केलं. थेट पण मनानं निर्मळ, सुरात न बोचणारा रांगडेपणा, महाराष्‍ट्रात कार्य व जगभरात हवा करणाऱ्या लोकांचं शहर असलेल्या नागपुरात आल्‍यावर माहेरी आल्‍यासारखं वाटतं, असं सई ताम्हणकर म्‍हणाली.

या कार्यक्रमात समीर चौगुले, विशाखा सुभेदार, अरुण कदम, प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे, गौरव मोरे, ओंकार भोजने, वनिता खरात आणि हास्यजत्रा चमू यांनी नागपूरकरांना खळखळवून हसवलं! महाराष्‍ट्राची हास्‍यजत्रा या कार्यक्रमाचे परीक्षक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर आणि सूत्रसंचालन करणारी प्राजक्‍ता माळी यांनी खास वऱ्हाडीत रसिकांशी संवाद साधला.

छत्रपती शिवाजी महाराजांची सून आणि विदर्भाची कन्या ताराराणी यांच्यावर आधारित नाट्यप्रवेश यावेळी सादर करण्यात आला. मंचावर 'हर हर महादेव'चा गजर करताच उपस्थित प्रेक्षकांनीही तिच्‍या सुरात सूर मिसळला. 'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमातील सध्‍या गाजत असलेले गायक कैवल्‍य केजकर, जगदीश चव्‍हाण, भाग्‍यश्री टिकले यांनी कार्यक्रमात विविध गीतं सादर केली.

'अजूनही बरसात आहे', 'स्वराज्यसौदामिनी ताराराणी', 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेतल्या कलाकारांनी; उमेश कामत, मुक्ता बर्वे, स्वरदा थिगळे आणि मधुरा वेलणकर यांनी; या वेळी उपस्थित राहून प्रेक्षकांशी सवांद साधला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह डॉ. विलास डांगरे, रा. स्व. संघाचे विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, उपायुक्‍त पखाले, कांचन गडकरी, वरिष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे, गजानन निमदेव, संदीप भारंबे, हॉटेल अशोकचे सीएमडी संजय गुप्‍ता, दीपेन अग्रवाल, सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचं संचालन रेणुका देशकर यांनी केले. प्रा. अनिल सोले यांनी प्रास्‍ताविक केले. हा संपूर्ण सोहळा ३१ डिसेंबरला रात्री ९ वा. सोनी मराठीवर पाहता येणार आहे. पाहा, 'महाराष्‍ट्राची हास्‍यजत्रा' न्यू इयर स्पेशल – 31 डिसेंबर, रात्री 9 वा. सोनी मराठी वाहिनीवर.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT