बीड भाजप जिल्हाध्यक्षाच्या शेतातील पत्त्याच्या क्लबवर छापा, ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

बीड भाजप जिल्हाध्यक्षाच्या शेतातील पत्त्याच्या क्लबवर छापा, ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड, पुढारी वृत्तसेवा : शहरापासून जवळच असलेल्या चऱ्हाटा फाटा परिसरात भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या शेतात सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर पोलीसांनी छापा टाकला. यावेळी जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, आलिशान चारचाकी गाड्या असा एकूण ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केली. याप्रकरणी राजेंद्र मस्के यांच्यासह ५० जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बीडपासून जवळच असलेल्या चाराठा रोडवर भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे शेत आहे. या शेतात एस स्पोर्ट क्लबच्या नावाखाली पत्त्याचा क्लब चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी मंगळवारी (दि. २८) रोजी मध्यरात्री सहकाऱ्यांसह छापा टाकला. यावेळी जुगार खेळणाऱ्या ४७ जणांना रंगेहाथ पकडले. यानंतर ४७ जणांसह रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व चारचाकी वाहने, मोबाईल असा एकूण ७५ लाख ६२ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

या प्रकरणी जागा मालक राजेंद्र मस्के, यश स्पोर्ट क्लब मालक व इतर ५० जणांविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः पंकज कुमावत व त्यांच्या कार्यालयातील हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, राजू वंजारे, सचिन आहंकारे, रामहरी भडाने, हुंबे मेजर यांनी केली.

शिवसेना जिल्हाप्रमुखावर केली होती कारवाई

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावर यांनी मागील महिन्यात शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या गुटख्याच्या गोदमावर छापा टाकून लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला होता. या प्रकरणानंतर शिवसेनेने संबंधित जिल्हाप्रमुखाचे पद काढून घेतले. आता भाजप जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल झाल्याने जिल्‍ह्यात  मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button