एनसीबीने २ ऑक्टोंबर रोजी कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर छापा टाकत या प्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक केली. यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूड आणि ड्रग्ज हे वादग्रस्त नातं सर्वांच्या समोर आलं. या प्रकरणानंतर बॉलिवूड आणि ड्रग्जची चर्चा होत असताना सुभाष घई यांनी १९९० चा एक जुना फोटो शेअर करुन एक पोस्ट लिहली आहे. ड्रग्ज प्रकरणाबरोबर आता सुभाष घई यांच्या 'त्या' फोटोची देखिल चर्चा होऊ लागली आहे.
वर्षाभरापूर्वी अभिनेता सुशांत सिंग यांच्या मृत्यू नंतरच्या तपासात त्याच्याकडे ड्रग्ज आढळलं होतं. तसेच सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला देखिल या प्रकरणात अटक करण्यात आली होती. यानंतर एनसीबीने अनेक बॉलिवूडच्या कलाकारांच्या घरावर छापे टाकत त्यांच्याकडून अमली पदार्थ जप्त केले होते.
आता पुन्हा कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर छापा टाकून आर्यन खान याला अटक केल्याने बॉलिवूडचे ड्रग्ज सोबत असेललं कनेक्शन पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. खरंतर हे नातं काही आताचं नाही. बॉलिवूडमध्ये ड्रग्ज घेणाऱ्या कलाकारांचा इतिहास फार जुना आहे. अगदी ८० च्या दशकापासून या ड्रग्ज कनेक्शनने बॉलिवूडला पछाडलं आहे. तेव्हा पासून बॉलिवूड या ड्रग्ज प्रकरणाचा सामना करत आहे.
अशाच एका इतिहासाची आठवण ज्येष्ट दिग्दर्शक सुभाष घई यांनी करुन दिली आहे. सुभाष घई यांनी १९९० सालचा एक फोटो कू या समाज माध्यमावर शेअर करत एक पोस्ट लिहली आहे. ते म्हणतात, माध्यमे या गोष्टीचा साक्षीदार आहेत की, १९९० साली बॉलीवूड मधील दिग्गज कलाकार एकत्र येत त्यांनी ड्रग्ज विरोधात आंदोलन केले होते. या कलाकारांमध्ये अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, जितेंद्र, मिथुन, जॉकी श्रॉफ, अमिर खान, गुलशन ग्रोवर, शबाना आजमी, डिंपल कपाडिया, टीना खन्ना, पद्मिनी कोल्हापुरे आदींसह अनेक मोठे कलाकार सहभागी होते. या आंदोलनानचे आयोजन स्वत: सुभाष घई यांनी केले होते. यावेळी सर्व कलाकार एकत्रित येत त्यांनी ड्रग्जचा विरोध केला व यापासून आपल्या येणाऱ्या पिढीला वाचविण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.
या फोटोसहित पोस्ट शेअर करत सुभाष घई यांनी असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. की, बॉलिवूड नेहमीच ड्रग्जच्या विरोधात उभा राहिला आहे. सध्या सुभाष घई यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच यावर अनेक प्रतिक्रीया देखिल येत आहेत. यात तथ्य आहे की, बॉलिवूडने नेहमी एकत्र येत ड्रग्ज सारख्या प्रकरणाचा विरोध केला आहे. पण, हे देखिल तितकेच खरे आहे की बॉलिवूड आणि ड्रग्जचं नातं देखिल जुनं आहे आणि ते नेहमी टिकवलं जात आहे. म्हणूनच वारंवार बॉलिवूड मधील कलाकार अमंली पदार्थांचे सेवन करताना आढळतात. त्यांच्यावर कारवाई देखिल होते. शिवाय बॉलिवूडच्या आलिशान पार्ट्यांमध्ये असे पदार्थ आढळल्याची चर्चा नेहमीच होत असते.