तुळजापूर; देविदास पाटील : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. वर्षातून तीन वेळा तुळजाभवानीची मूर्ती निद्राकाळाकरिता पलंगावर निद्रिस्त जाते. तर सीमोल्लंघना करिता मूळ मूर्ती पालखीत घालून मिरविली जाते.
तुळजाभवानीची पूजाअर्चा करण्याचं काम वर्षभर स्थानिक पुजारी करत असले तरी पालखी आणण्याचा मान नगरजवळील भिंगारच्या भगत घराण्याकडे आहे. देवीला ज्या पालखीतून मिरविली जाते; ती आणण्याचा मान नगरजवळील जनकोजी तेली (भगत) घराण्याकडे आहे. मध्ययुगीन कालखंडात भिंगारचा जनकोजी तेली तुळजापूरला येताना आपल्या घराला आग लावून निघाला. तुळजापूरला येत असताना रस्त्यातचं त्याचं निधन झालं. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने दरवर्षी तेल्याच्या पालखीत बसून सीमोल्लंघन खेळण्याकरिता जाण्याची प्रथा आजही कायम आहे.
जनकोजीची अकरावी पिढी ही सेवा अविरतपणे बजावते. जनकोजी तेल्याच्या घराण्याचा मान म्हणून पालखी तर आहेच, शिवाय देवीला सीमोल्लंघनाकरिता सिंहासनावरून हलविण्यापूर्वी तेल्याचे वंशज आपल्या करंगळीच्या रक्ताचा टिळा देवीच्या चरणाला लावण्याची प्रथा होती. तुळजाभवानीची पालखी आणण्याचा मान भिंगारला असला तरी प्रत्यक्षात पालखी तयार करण्याचा सन्मान मात्र राहुरीकरांना लाभतो. पालखी तयार करताना सर्व समाजातील लोकांना त्यात सामावून घेतलेले आहे.
पालखीचे सुतारकाम, लोहारकाम आणि रंगरंगोटीचे काम राहुरी येथे पूर्ण केले जाते. निद्राकालावधीत देवी ज्या पलंगावर झोपतात तो पलंग अहमदनगरमधील पलंगे नावाच्या तेली घराण्याकडून दिला जातो. तर पलंग तयार करण्याचं काम आंबेगाव-घोडेगावमधील ठाकूर घराने पार पाडते. दसऱ्यापूर्वी एक महिना अगोदर हा पलंग अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातून मिरवत तुळजापूरला येत असतो. यातही विशेष बाब म्हणजे तुळजाभवानीचा पलंग जुन्नरला गेल्यानंतर शिवनेरी किल्ल्यासमोर विश्रांतीसाठी ठेवला जातो.
छत्रपती शिवरायांच्या भक्तीत तुळजाभवानीचा अग्रक्रम आहे. त्याचा हा योगायोगच. कुठल्याही मंदिरामध्ये पलंग आणि पालखी या वस्तू पवित्र असल्याने त्याचं जतन करून ठेवले जाते. मात्र याउलट तुळजाभवानी मंदिरातील पलंग आणि पालखी एकाच वेळी वापरून त्या होमात टाकून नष्ट केल्या जातात. हे वेगळेपण आहे. देवीच्या शिरावर मुकुट बसविण्यापूर्वी देवीच्या मस्तकी पानाची चुंबळ करावी लागते. ते पान पुरविण्याची जबाबदारी एका तांबोळी नामक मुस्लिम घराची आहे. हे तांबोळी घराणे नवरात्रीत आपल्या घरी परंपरेने घटस्थापनासुद्धा करते. त्यानुसार मंदिरातील अनेक कामे परंपरेने एकाच घराण्याकडे अखंडपणे चालत आलेली आहेत. अल्पशा मोबदल्यात ही मंडळी देवीची सेवा म्हणून दिवसरात्र राबतात.
त्यामध्ये जाधव घराणे नगारा वाजविण्याचे काम करते. कदम घराण्यातील घरे घंटी वाजवितात. पलंगे देवीच्या पलंगाची सेवा करतात, न्हावी समाजाकडे सनई-चौघडा वाजविण्याचे काम आहे. याप्रमाणे हरेक जाती-धर्माला इथं परंपरेनं सेवा बजाविण्याचा अधिकार आहे. लाखोचे दान देणारी तुळजाभवानी पहिला नैवेद्य भाजीभाकरीचा पसंत करते. तो उपरकर घराण्याकडून येतो.
देवीची प्रक्षाळ, सिंहासन यासारख्या पूजेदरम्यान हाताखाली मदत करण्याचे काम पवेकर करतात. भक्ताने सिंहासनपूजा केल्यानंतर देवीजींच्या अंगावरील चिन्हे दाखविण्याचे काम हवालदार करायचा.
सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा तीन वेळा दूधखिरीचा नैवेद्य हा कोल्हापूर संस्थानच्या वतीने दिला जातो. त्यासोबत पानाचा एक विडाही दिला जातो. तुळजाभवानीच्या सेवेत खंड पडू नये म्हणून अनेक सेवेकरी रात्रंदिवस झटत असतात. त्यातही एक विशेष सेवा म्हणजे तुळजाभवानीला उन्हाळ्यात उकाडा लागू नये म्हणून पलंगे सलग तीन महिने देवीजींना वारा घालतात. सिंहासनारूढ देवीजींना वारा घालण्याकरिता पलंगे हातात पंखा घेऊन आपली चाकरी बजावत असतात. यासोबतच चैत्रशुद्ध बलिप्रतिपदेपासून ते मृगाच्या आगमनापर्यंत दररोज दुपारी देवीला नैवेद्यात सरबत दिले जाते. हे लिंबू सरबत पुरविण्याचे काम वंशपरंपरेने भिसे आणि दीक्षित घराण्याकडेच आहे. विनामोबदला ही मंडळी आपले काम चोखपणे करत असतात. निजाम राजवटीपासून तुळजाभवानी मंदिराचा कारभार हाकण्याकरिता संस्थानची निर्मिती झाली असून उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याचे प्रमुख आहेत.
तुळजापुरातील पुजाऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या भक्ताची ते लेखी नोंद ठेवतात. त्यामुळे वंशपरंपरेने आपल्या कुलदेवतेचा पुजारी हा ठरलेला आहे. साहजिकच आपल्या वंशजांना इतिहास जाणून घेण्याकरिता पुजाऱ्यांचे बाड उपयोगी ठरते. देवीचे पुजारी हे आपल्याकडे येणाऱ्या भक्ताची राहण्याखाण्याची व्यवस्था स्वत:च्या घरीच करतात हे वेगळेपणआहे.
देवीच्या सेवेत तुळजापुरातील पानेरी, मळेकरी, दशावतार आणि भारतीबुवाचे मठ कार्यरत आहेत. शेकडो वर्षांपासून या मठाचे मठाधिपती दिवसरात्र सेवा करतात. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत या मठाधिपतींना देवीच्या सेवेत राहावे लागते. दशावतार मठाची जागा देवी मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असली तरी या मठाच्या महंतांना आश्विन अमावास्ये शिवाय वर्षभर कधीच मंदिरात प्रवेश करण्याचा हक्क नाही. त्यामुळे हे महंत वर्षभर हा दिवस सोडून कधीच पूर्वेकडे असणारा आपल्या मठाचा दरवाजा ओलांडत नाहीत.
नवरात्रात अनेक परंपरा पाळतात. त्यानुसार नवरात्रीत येथील रहिवासी गादी, पलंगाचा त्याग करतात. चप्पल घालत नाहीत. इतरही अनेक प्रथा आहेत. त्यानुसार कुंभाराचे चाक, तेलाचा घाणा गावात चालवत नाहीत. तुळजाभवानी म्हणजे शाक्त संप्रदायाशी निगडित असल्याने तिच्या प्रथापरंपराही काही वेगळ्याच आहेत.
देवीच्या परंपरेत काळभैरवाचा भेंडोळी उत्सवही महत्त्वाचा आहे. एका काठीला पलिते बांधून ती पेटवून निघालेली ती भव्य ज्वालायात्रा पाहताना थरकाप उडतो. देवांचे रक्षण करणारा कालभैरव म्हणजे या परिसराचा कोतवालच. त्याच्या अक्राळविक्राळ रूपाला अनुसरून त्याला रोजचा नैवेद्यही मांसाहाराचा असतो.
काळभैरव रखवालदार आहे. तो वर्षांतून एकदा अश्विन अमावस्येला तुळजाभवानी परिसराची पाहणी करायला निघतो. त्याचे फिरणे हे रात्रीचे असते. त्याला उजेड हवा म्हणून हा भेंडोळी उत्सव आला असावा. भैरोबाच्या नावानं चांगभलं आणि तुळजाभवानीचा उदो उदो करत तरुणांनी भेंडोळी अंगावर घेतलेली असते.
ही भेंडोळी घेऊन ते अरुंद गल्लीबोळातून जातात. पणया भेंडोळीमुळे त्यांना कधीही इजा झाल्याचे उदाहरण नाही. काळभैरवाला काशीचा कोतवाल म्हटले जाते. त्याची ठाणी भारतात सर्वत्र असली तरी भेंडोळी उत्सव उत्तरेत काशी आणि दक्षिणेत तुळजापूर येथेच फक्त साजरा होतो.
मंदिरात आल्यावर देवीला पदस्पर्श करून ही भेंडोळी वेशीबोहर जाऊन विझवली जातात. अश्विन अमावस्येला भेंडोळी बरोबरच महत्त्वाचा समारंभ म्हणजे दशावतार मठाचे महंत या दिवशी वाजतगाजत देवीच्या दर्शनासाठी येतात. या दिवशी देवीला पांढरी साडी नेसवण्याची प्रथा आहे. ही साडी हा दशावतार मठाचा आहेर असतो. ते वैराग्याचे प्रतीक समजले जाते.
या दिवशी दशावतार मठाचे महंत आणि काळभैरवाचे पुजारी यांना पेहराव देऊन त्यांचा सत्कार केला जातो. त्यात त्यांना जो फेटा बांधला जातो, तो देवीच्या साडीचा असतो. काही प्रथा, परंपरा अगदी समाजानेही जपल्या आहेत. अद्यापही तुळजापुरात तेल्याचा घाणा, कुंभाराचे चाक, कातडी कमावण्याचा उद्योग इथं चालविला जात नाही.
श्री तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी. त्यामुळे ज्याप्रमाणे आई सर्वाना सामावून घेते त्याप्रमाणे देवीच्या दरबारात गुढीपाडवा, होळी, रंगपंचमी असे सर्वच सण साजरे होतात. एवढेच नव्हे तर वैष्णवपंथाचा गोपाळकालाही आषाढी एकादशीला इथं साजरा होतो. गुढीसोबतच सर्व राष्ट्रीय सणाला मंदिरावर राष्ट्रध्वजही फडकविण्याची परंपरा इथं कायम आहे.