ड्रग्ज पार्टी : असा झाला आर्यनच्या पार्टीचा बेरंग | पुढारी

ड्रग्ज पार्टी : असा झाला आर्यनच्या पार्टीचा बेरंग

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कॉर्डेलिया द एम्प्रेस क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्यासह बड्या हस्तींच्या मुलांना अटक केल्यानंतर या रेव्ह पार्टीच्या सुरस कथा आता बाहेर येऊ लागल्या आहेत. अथांग समुद्रात जहाजावर ही पार्टी तीन दिवस रंगणार होती. मात्र, त्याआधीच एनसीबीने हा बेत उधळून लावला आणि पार्टीचा बेरंग झाला.

क्रूझवरील या ड्रग्ज पार्टी मुळे बॉलीवूडचा किंग शाहरुख खान याचे संपूर्ण कुटुंबच चर्चेत आले आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरुख खानचा मुलगा आर्यन चेक इन करत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत असलेल्या अरबाजच्या शूजच्या सोलमध्ये ड्रग्ज लपवलेले होते.

आर्यनच्या खिशातून ड्रग्ज सापडले नसले, तरी हे ड्रग्ज फक्त आर्यन, अरबाज आणि त्यांच्या साथीदारांच्या वापरासाठी आणले गेले होते. याचा पुरावा आर्यन आणि अरबाजच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये सापडला आहे. आर्यनने अरबाज मर्चंटला ड्रग्ज आणण्यास सांगणारा मॅसेज व्हॉट्सअ‍ॅपवर आढळला. ड्रग्जसाठी आर्यनने पैसे दिल्याचेही पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत.

बिनबुलाये मेहमान

क्रूझवरील पार्टीला मला पाहुणा म्हणून बोलावले होते, अशी बतावणी आर्यनने केली. मात्र, ती फार काळ टिकली नाही. आर्यनकडे किंवा त्याच्या नावाने या पार्टीचे कोणतेही निमंत्रण नाही किंवा तसा प्रस्तावदेखील कागदोपत्री नाही. पार्टी आयोजित करणार्‍या कंपनीचेही त्याच्याकडे असे कोणतेही आमंत्रण किंवा ई-मेल नाही. मला आमंत्रित केले गेले होते, असे फक्‍त आर्यन म्हणतोय. अरबाजला प्रत्येक गोष्टीची माहिती होती असे म्हणत आर्यन प्रश्‍नांची उत्तरे टाळत असल्याचे एनसीबीच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

आर्यन खान ढसाढसा रडला

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीची चौकशी सुरू असताना आर्यन सतत रडत होता. शेवटी एनसीबीच्या अधिकार्‍यांनी त्यांच्या लँडलाईनवरून आर्यनचे बोलणे त्याच्या अब्बा शाहरुख खान याच्याशी करून दिले. हा कॉल जेमतेम दोन मिनिटे चालला. आर्यन आणि शाहरुख यांच्यात काय बोलणे झाले याचा तपशील उघड झालेला नाही.

मात्र, आपला मुलगा ड्रग्ज घेतो याची पूर्वकल्पना शाहरुख खान आणि गौरी खान यांना आधीपासूनच होती, असे एनसीबीच्या सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या चार वर्षांपासून ड्रग्ज घेत असल्याचे त्याने कोठडीत कबूल केले. दुबई, ब्रिटन आणि इतर अनेक देशांतही अमली पदार्थांचे सेवन केल्याचे त्याने कबूल केले. अरबाज मर्चंटदेखील आर्यनसोबत सतत ड्रग्ज घेत आला आहे.

म्हणजे पार्टी अजून बाकीच होती

ड्रग्ज पार्टी प्रकरणी शाहरुखचा मुलगा आर्यनसह आठ जणांना अटक केल्यानंतर परवानगीसह गोव्याकडे रवाना झालेली कॉर्डेलिया द एम्प्रेस क्रूझ सोमवारी मुंबईकिनारी परतली आणि एनसीबीचे पथक तिची वाटच पाहात होते. ही क्रूझ किनार्‍याला लागताच एनसीबीने छापा टाकला आणि अटक केलेल्या आरोपींच्या खोल्यांची झडती घेत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज हस्तगत केले.

मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल येथून शनिवारी कॉर्डेलिया गोव्याकडे निघाली तेव्हा जहाजावर 1800 प्रवासी होते. एनसीबीने आर्यन खानसह आठ जणांना अटक केल्यानंतर क्रूझला पुढे जाण्याची परवानगी दिली. मात्र, 200 प्रवाशांनी आपला दौरा रद्द केला. उर्वरित प्रवाशांसह ही क्रूझ मग गोव्यापर्यंत जाऊन आली. या प्रवाशांमध्ये बहुतांश उत्तर भारतातील प्रवाशांचा समावेश आहे.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली 20 अधिकार्‍यांच्या पथकाने सोमवारी सकाळी क्रूझवर पुन्हा छापा टाकला. आणखी आठ जणांना अटक करताना या पथकाने मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्‍त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

क्रूझवरील सर्व प्रवाशांची यादी एनसीबीने तयार केली आहे. जे प्रवासी बुकिंग असूनही जहाजावर आढळले नाहीत, त्यांना फरार घोषित करीत शोध घेतला जात आहे.

एनसीबीच्या पथकाने त्यासाठी दिल्ली, गोवा आणि बंगळूर येथेही छापा टाकण्याची तयारी सुरू केली आहे. एनसीबीने मुंबईतील वांद्रे, अंधेरी, लोखंडवाला येथे छापे टाकून अमली पदार्थांचा पुरवठा करणार्‍यांना ताब्यात घेतले आहे. एनसीबीचे पथक ड्रग पॅडलरचा कसून शोध घेत आहे.

आयोजक, क्रूझ कंपनी एनसीबीच्या रडारवर

बंदी असलेल्या अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी ही रेव्ह पार्टी आयोजित करणारी नवी दिल्ली येथील कॅनेप्लस ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि पार्टीसाठी क्रूझ उपलब्ध करून देणारी कॉर्डेलिया हे दोघेही एनसीबीच्या रडारवर आले आहेत. पुढचे 15 दिवस एनसीबी या क्रूझच्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहे.

बॉलीवूड मन्नतवर

रेव्ह पार्टी प्रकरणात बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यनला अटक झाल्यानंतर बॉलीवूडमधील अनेक कलाकार मात्र शाहरूखला आधार देण्यासाठी सरसावले आहेत. दिग्गज कलावंतांनी ट्विटवरून आम्ही तुझ्या सोबत आहोत, असा हॅशटॅग ट्रेंड चालवत शाहरूखला दिलासा दिला. या घडामोडीत अभिनेता सलमान खान शाहरूखचे सांत्वन करण्यासाठी थेट मन्नतवरच धडकला.

दिग्गजांनी दिला धीर

चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी ट्विट करून भावना मांडल्या. शाहरूखला उद्देशून लिहिलेल्या ट्विटमध्ये मेहता म्हणाले, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. मुलाला संकटात सापडल्याचे पाहणे हे कोणत्याही पालकांसाठी वेदनादायी असते. मात्र न्यायालयाबाहेर लोकांकडून न्यायनिवाडा करणे हे त्याहून वेदनादायी आहे.

मी तुझ्या सोबत कायम

अभिनेत्री पूजा भट्टनेदेखील ट्विटमधून पाठबळ दिले. या कठीण प्रसंगी मी तुझ्या सोबत उभी आहे. तुला याची गरज नसली तरी मला आहे, अशा आशयाचा संदेश पूजाने केलेल्या ट्विटमध्ये दिला.

सेलिब्रिटी मनोरंजनाचे साधन नाहीत

अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीनेही ट्विटवरून भावना मांडल्या. ती म्हणते, अशा प्रकारे कोणाच्या मुलाला अडचणीत पाहून खूप वाईट वाटते. मनोरंजन विश्‍वातील लोकांचे जीवन कसे इतरांसाठी मनोरंजनाचे साधन बनले आहे, हे यातून स्पष्ट होते.

असे तुटून पडणे योग्य नाही

अभिनेता सुनील शेट्टीनेदेखील ट्विट करून शाहरूखला पाठबळ दिले. जेव्हा आमच्या विश्‍वात असे घडते, तेव्हा माध्यमे यावर तुटून पडतात, असा रोषही सुनील शेट्टीने व्यक्त केला.

मन्नतवर छापे पडणार?

आर्यनचा सर्वात जवळचा मित्र अरबाज मर्चंट कुठून ड्रग्ज आणायचा याची माहिती एनसीबीला मिळाली आहे. या प्रकरणात अजूनही छापे टाकले जात आहेत आणि आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. एनसीबीचे छापे दिल्‍लीतही सुरू असून एक टीम गोमित चोप्राच्या घरीही पोहोचली आहे.

एनसीबीच्या सूत्रांनुसार अटक प्रक्रियेनंतर, एनडीपीएस कायद्यातील तरतुदींनुसार प्रत्येक आरोपीच्या घराची झडती घेण्याचीही तरतूद आहे. त्यानुसार मुंबईत सुपरस्टार शाहरुख खानचे घर मन्नतचीही झडती घेतली जाईल.

Back to top button