ड्रग्ज प्रकरण : २ ऑक्टोंबर रोजी अलिशान क्रूझवर ड्रग्ज प्रकरणात कारवाईवेळी मनीष भानुशाली आणि किरण गोसावी यांना नियमानुसार सहभागी करून घेतले, असा खुलासा मुंबई एनसीबीने केला आहे. नबाब मलिक यांचे आरोप तथ्यहीन असल्याचेही उप महानिदेशक(उत्तर) ज्ञानेश्वर सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद करून नबाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्याची अपेक्षा होती मात्र, त्यांनी लिखित खुलासा वाचून दाखवत पत्रकार परिषद आटोपती घेतली.
क्रूझवर कारवाई केल्यानंतर एनसीबीने पकडलेल्यांना किरण गोसावी आणि मनीष भानुशाली हे दोघे घेऊन जात असून ते भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.
त्यानंतर एकच गदारोळ उठला. या आरोपांना एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे उत्तर देतील अशी शक्यता होती. मात्र, त्यांच्याऐवजी अन्य अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला.
'एनसीबीने ड्रग्ज प्रकरण हातळले असून, नियमानुसार कारवाई केली असून मोहक जैस्वाल याच्या माहितीवरून एका व्यक्तीला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार क्रूझवर छापा टाकला. या छाप्यात कोकेन, चरस यांसारखे ड्रग्ज सापडले. या कारवाईत आर्यन खान, मूनमून धमेचा, अरबाज मर्चंट, नुपूर सारिका, गोपाल आनंद समीर सेहगल, भास्कर अरोरा यांच्यासह अन्य संशयितांना ड्रग्जसहित पकडले आहे. ही कारवाई नियमानुसार झाली असून त्यात मनीष भानुशाली आणि किरण गोसावी या दोघांना सहभागी करून घेतले होते. हे नियमानुसार केले होते,' असा दावा या अधिकाऱ्यांनी केला आहे.
कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून (एनसीबी) बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक केली. या कारवाईवर राष्ट्रवादीने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केले आहेत. ज्यावेळी आर्यन खान याला ज्या व्यक्तीने ताब्यात घेतले, त्या व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण एनसीबीने हा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नसल्याच जाहीर केलं होतं. पण राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्या व्यक्तीसंबंधी मोठा गौप्यस्पोट केला आहे. आर्यन खान याला ज्या व्यक्तीने ताब्यात घेतले. तो व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नव्हता. त्या व्यक्तीचे फोटो भाजपच्या नेत्यांसाबत आहेत, असा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे.
हेही वाचा: