मनोरंजन

Bhalbharti Movie : ‘बालभारती’चे अफलातून हटके मोशन पोस्टर प्रदर्शित

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी चित्रपट 'बालभारती'चे २ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. त्याचे मोशन पोस्टर नुकतेच प्रकाशित करण्यात आले. २३ सेकंदांच्या या मोशन पोस्टरमध्ये या चित्रपटातील आघाडीचे कलाकार दिसतात. एकंदर पोस्टर पाहता हा चित्रपट आणि त्याचा विषय किती वेगळा आहे हे लक्षात येते. 'बालभारती' चे दिग्दर्शन नितीन नंदन यांचे आहे आणि निर्मिती 'स्फियरओरीजीन्स' यांनी केलेली आहे. (Bhalbharti Movie)

या मोशन पोस्टरचा नवखेपणा म्हणजे, यात आर्यन मेंघजी हा बाल कलाकार आईनस्टाईनच्या भन्नाट रुपात अनेक गॅझेटच्या गराड्यात बसलेला दिसतो. समोर एक पेंड्यूलम म्हणजे लोलक हलताना दिसतो. त्यावर मराठी व इंग्लिश आद्याक्षरे लिहिलेली आहेत. त्यात एक आयडिया त्याच्या डोक्यात येते आणि तिची चमक त्याच्या चेहऱ्यावर दिसते आणि त्याचे डोळे चकाकतात. मग गंमत सुरू होते. एक एक कलाकार दिसू लागतात. नंदिता पाटकर 'टॉक इन इंग्लिश' लिहिलेले हेल्मेट घालून येते. अभिजित खांडकेकर मुलाचे कौतुक करतो आणि पहिल्यांदाच वडिलांच्या भूमिकेतील सिद्धार्थ जाधव मोठ्या तन्मयतेने इंग्लिश-मराठी डिक्शनरी वाचताना दिसतो. मग शेवटी एक विमान उडत जाते आणि समोर शब्द येतात – 'मीट द न्यू चाईनस्टाईन!'

हे मोशन पोस्टर प्रेक्षकांना या चित्रपटाच्या विषयावर विचार करायला नक्की भाग पाडेल! पालकांच्या मनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल असलेली चिंता. तीच बालभारतीमध्ये रंगवलेली आहे. सर्व आई-वडील नेहमी हा विचार करत असतात की आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत आणि सद्य परिस्थितीत रुजलेली ही आजची कथा आहे. म्हणून आजच्या प्रत्येक घराची ही कथा आहे. यामध्ये मराठी भाषा, सर्जनशीलता आणि नावीन्य किंवा संशोधन यांचा मिलाफ आहे.

'हेल द इनोव्हेशन' हे आजचे परवलीचे शब्द इथे अगदी समर्पक वाटतात आणि त्याला 'जय जवान, जय किसान, जय विज्ञान व जय संशोधन' या नवीन घोषणेचे पाठबळ मिळाले आहे. चित्रपटाबद्दल बोलताना नितीन नंदन म्हणाले, "बालभारती हा चित्रपट प्रत्येक महाराष्ट्रीयन कुटुंबाशी जोडला जाईल. हा प्रत्येक पालक, विद्यार्थी आणि शिक्षकाचा चित्रपट आहे."

निर्माते कोमल आणि संजय वाधवा म्हणाले, "हा चित्रपट आम्ही अगदी मनापासून आणि मोठ्या श्रद्धेने निर्माण केला आहे. आम्हाला खात्री आहे की चित्रपट पाहणारे प्रत्येक कुटुंब या विषयाशी सहमत होईल आणि त्यांना मजा येईल."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT