Amol Kolhe Savitribai Phule Serial Pudhari
मनोरंजन

Amol Kolhe: 'सावित्रीबाई फुले' मालिका बंद होऊ देणार नाही! अमोल कोल्हेंची मोठी घोषणा; रोहित पवारांकडून 50 लाखांची मदत

Amol Kolhe Savitribai Phule Serial Rohit Pawar Support: 'सावित्रीबाई फुले' मालिका 14 जून रोजी बंद होत असली तरी ती पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा अमोल कोल्हे यांनी केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Amol Kolhe Savitribai Phule Serial Rohit Pawar Support: अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या 'सावित्रीबाई फुले' या मालिकेबाबत मोठी घोषणा केली आहे. 14 जून रोजी ही मालिका बंद होणार असली तरी ती पुन्हा सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी मालिकेसाठी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

एका कार्यक्रमात बोलताना अमोल कोल्हे यांनी सध्याच्या सामाजिक आणि वैचारिक वातावरणावरही भाष्य केले. "आजकाल वैचारिक बैठक कमी पडत आहे का, असा प्रश्न पडू लागला आहे. सध्या 'झेनझी'ची चर्चा सुरू आहे. मात्र त्यांची वैचारिक बैठक नेमकी काय आहे, याचाही अभ्यास व्हायला हवा," असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीतील काही अनुभवही मांडले. "2017 मध्ये मी अनवधानाने नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली होती. त्या वेळी मी राजकारणात नव्हतो. त्या भूमिकेवरून पुढील काळात माझ्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मात्र आता सावित्रीबाई फुले मालिकेच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार मांडत असताना कौतुकासाठी फारसे हात पुढे आले नाहीत, याचे वाईट वाटते," असे कोल्हे म्हणाले.

'सावित्रीबाई फुले' मालिका 14 जून रोजी संपणार असल्याची माहिती देताना त्यांनी पुढे मोठी घोषणा केली. "माझी वैचारिक भूमिका ठाम आहे. त्यामुळे ही मालिका बंद पडू देणार नाही. पैसा कुठून उभा राहील, कोणत्या वाहिनीवर मालिका प्रसारित होईल, हे सध्या सांगता येणार नाही. पण 14 जूननंतरच्या पहिल्याच आठवड्यात ही मालिका पुन्हा सुरू करण्याचा माझा निर्धार आहे," असे त्यांनी सांगितले.

याशिवाय 21 जूनपासून राज्यभर दौरा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. "महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरणार आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी हा दौरा असेल," असे ते म्हणाले.

दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या या भूमिकेला पाठिंबा देत आमदार रोहित पवार यांनी मालिकेसाठी 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली. त्यामुळे 'सावित्रीबाई फुले' मालिका पुन्हा सुरू होण्याच्या शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमोल कोल्हे यांच्या या घोषणेमुळे फुले दांपत्यांच्या विचारांवर आधारित ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार का, याकडे आता राज्यभरातील प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT