Latest

Chandrakant Khaire : आता कार्यालये फोडायला मी जाऊ का ? : चंद्रकांत खैरेंचा पदाधिकार्‍यांना सवाल

अविनाश सुतार

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : याआधी औरंगाबादेत शिवसेनेचा एखादा नगरसेवक जरी फुटला तरी त्याविरोधात तीव्र पडसाद उमटायचे. शिवसैनिक रस्त्यावर उतरायचे. मात्र, आता जिल्ह्यातील पाच आमदार बंडात सहभागी असून देखील स्थानिक पातळीवर शांतताच आहे. त्याबद्दल शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी रविवारी आपल्या पदाधिकाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. नेता म्हणून मी कार्यालये फोडायला जाऊ का, संघटना कशासाठी आहे, पदाधिकारी काय करत आहेत, असा उलट सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक आटोपून चंद्रकांत खैरे  (Chandrakant Khaire) रविवारी औरंगाबादेत परतले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील बंडखोर आमदार संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट आणि रमेश बोरणारे यांच्यावर निशाणा साधला. पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे, माजी आमदार किशनचंद तनवाणी, माजी महापौर त्र्यंबक तुपे, नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, मकरंद कुलकर्णी, विजय वाघचौरे, प्रतिभा जगताप, आशुतोष डंख आदींची उपस्थिती होती.

खैरे यांनी बंडखोर आमदारांवर कठोर शब्दात टीका केली. परंतु जिल्ह्यातून एवढे मोठे बंड होऊनही शिवसेना शांत का ? अशी विचारणा पत्रकारांनी खैरे यांना केली. सुरूवातीला खैरे यांनी शिवसेनेचा आक्रमकपण दिसून येईल, असे उत्तर दिले. त्यावर याआधी सामान्य नगरसेवक फुटला, तरी त्याच्या घरांवर हल्ले व्हायचे, यावेळी संघटना इतकी शांत कशी असा सवाल पत्रकारांनी केला. त्याच्या उत्तरात, आता नेता म्हणून मी कार्यालये फोडायला जाऊ का, संघटना कशासाठी आहे, पदाधिकारी काय करत आहेत, असे म्हणत खैरे यांनी जिल्हाप्रमुख दानवे आणि इतर पदाधिकाऱ्यांकडे कटाक्ष टाकला.

Chandrakant Khaire  : दानवे यांच्याकडून सारवासारव

संघटनात्मक पातळीवर शांततेबद्दलच्या मुद्यावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दानवे म्हणाले, आम्ही शांत बसलेलो नाहीत. आम्ही २२ तारखेला निदर्शने केली. आता उद्यापासून बैठका घेणार आहोत. बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ मोर्चा निघत असला तरी तिथे किती लोक आहेत हेही तपासावे लागेल. आमचे कोणतेही पदाधिकारी त्यांच्यासोबत नाहीत.

संजय शिरसाट यांनी बंडखाेरांची मोट बांधली

खैरे म्हणाले, जिल्ह्यातील सहापैकी पाच आमदारांनी गद्दारी केली आहे. शिवसेनेमुळे खूप काही मिळूनही त्यांनी ईमान राखले नाही. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी बंडखोरांची मोट बांधली. त्यांनी याआधी १९९१ सालीही बंड केले होते; पण पुन्हा शिवसेनेत येऊन सर्व काही मिळविले. आता पुन्हा गद्दारी केली. प्रदीप जैस्वाल यांनीही याआधी शिवसेना सोडली होती. जैस्वाल यांना महापौरपद, खासदारकी दिली. त्यांच्या लोकसभा निवडणुकीवेळी मी पालकमंत्री होतो, त्यांच्या निवडणुकीचा सर्व खर्च मीच केला होता. भूमरे यांना उद्धव ठाकरे यांनी कॅबीनेट मंत्री पद दिले, पण तेही शिंदे गटात सहभागी झाले. हे दु:खदायक आहे. त्यांना १९९५ साली मीच उमेदवारी मिळवून दिली होती, असे खैरे म्हणाले. वैजापूरचे आमदार बोरणारे, सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांच्यावरही खैरे यांनी टीका केली. पण सोबत अजूनही या आमदारांनी मातोश्रीवर जाऊन चूक झाली असे सांगावे, त्यांना माफ केले जाईल, असा दावाही खैरे यांनी केला.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT