Latest

Stock Market Closing Bell | गुंतवणूकदारांची ३ लाख कोटींची कमाई! सेन्सेक्स ७४२ अंकांनी वाढला, तेजीमागे होते ‘हे’ ५ घटक

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : अपेक्षेपेक्षा कमी झालेल्या अमेरिकेच्या महागाईच्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात तेजी परतली. या जागतिक मजबूत संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारानेही आज बुधवारी (दि.१५) उसळी घेतली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने (Sensex) ७४२ अंकांनी वाढून ६५,६५७.९३ अंकांवर बंद झाल. तर निफ्टी २३१ अंकांनी वाढून १९,६७५ .४५ वर बंद झाला. आजच्या सत्रात सेन्सेक्स १.१४ टक्के आणि निफ्टी १.१९ टक्क्यांनी वाढला.

द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, दिवाळी सणादरम्यान शेअर बाजारातील आजच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांना ३.१ लाख कोटींचा फायदा झाला आहे. यामुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३२५.२ लाख कोटींवर पोहोचले आहे.

संबंधित बातम्या 

सेन्सेक्सवर टेक महिंद्रा, विप्रो, टाटा स्टील, इन्फोसिस, टीसीएस, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स, रिलायन्स, ॲक्सिस बँक, एचसीएल टेक, कोटक बँक, एचडीएफसी बँक, एनटीपीसी हे शेअर्स १ ते ३.५० टक्क्यांदरम्यान वाढले. तर बजाज फायनान्स, इंडसइंड बँक आणि पॉवर ग्रिड हे शेअर्स घसरले.

मणप्पूरम फायनान्सचा शेअर १० टक्क्यांनी वाढला

३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीत नफ्यात ३७ टक्क्यांची वाढ नोंदवल्यानंतर मणप्पुरम फायनान्सच्या (Manappuram Finance Share Price) शेअर्सनी आज उसळी घेतली. एनएसईवर हा शेअर १० टक्क्यांनी वाढून १५४ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. त्यानंतर हा शेअर १५० रुपयांवर स्थिरावला.

बाजारातील तेजीत IT शेअर्स आघाडीवर

बाजारातील आजच्या तेजीत आयटी क्षेत्रातील शेअर्स आघाडीवर होते. सेन्सेक्सवर टेक महिंद्राचा शेअर्स टॉप गेनर होता. हा शेअर ३ टक्क्यांहून अधिक वाढून १,१७२ रुपयांवर पोहोचला. विप्रोचा शेअर २.१५ टक्क्यांनी वाढून ३८९ रुपयांवर गेला. निफ्टी आयटी सुमारे २ टक्क्यांने वाढला. इन्फोसिसचा शेअर सुमारे १.८० टक्के आणि टीसीएसचा शेअर सुमारे १.५० टक्क्यांने वाढला.

देशांतर्गत गुंतवणूकदारांमुळे बाजाराला सपोर्ट

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) सप्टेंबरपासून भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचा मारा केला. पण नोव्हेंबरमध्ये विक्रीची तीव्रता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. तर दुसरीकडे देशांतर्गंत गुंतवणूकदारांच्या (DII) खरेदीमुळे बाजारातील घसरण थांबण्यास मदत झाली आहे. एनएसई (NSE) वर उपलब्ध आकडेवारीनुसार, १३ नोव्हेंबर रोजी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) १,२४४.४४ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) ८३०.४० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

अमेरिकेतील महागाई दर

अमेरिकेतील महागाईची तीव्रता कमी झाली आहे. ऑक्टोबर महिन्यातील अमेरिकेतील महागाईचा दर (US inflation data) ३.२ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. चार महिन्यांतील पहिली घसरण आहे. यामुळे ट्रेझरी उत्पन्नात झपाट्याने घसरण होण्यास आणि शेअर बाजारात वाढ होण्यास मदत झाली आहे. तसेच यामुळे यूएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरवाढीचे सत्र थांबवण्याची आशा आहे.

बॉन्ड यील्ड घसरले

यूएस फेडद्वारे दर कपातीची शक्यता वाढल्याने १० वर्षीय यूएस बॉन्ड यील्ड मंगळवारी जवळपास २० बेस पॉइंट्सने घसरले आणि ते ४.४२ टक्क्यांवर आले. बॉन्ड यील्डची ही २२ सप्टेंबरपासूनची निच्चांकी पातळी आहे.

जागतिक बाजार

महागाई कमी झाल्याने अमेरिकेतील शेअर बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. एस अँड पी १.९१ टक्के आणि नॅस्डॅक कंपोझिट (Nasdaq) २.३७ टक्क्यांनी वाढून बंद झाला. या वाढीचा मागोवा घेत आज आशियाई बाजारानांही तेजीत व्यवहार केला. जपानचा निक्केई २२५ (Japan's Nikkei 225) निर्देशांक २.५२ टक्क्यांनी आणि हाँगकाँगचा हँग सेंग सुमारे ३ टक्क्यांनी वधारला.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT