कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासारख्या सामान्य जनतेच्या हृदयात स्थान असणाऱ्या नेत्याला विनाकारण अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगत भाजपवर टीका केली.
आजपर्यंत अनेक संकटे ताकदीने परतवणारे मुश्रीफ हे आरोपांच्या या संकटावर तितक्याच ताकदीने मात करतील.
आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
राजकारणात प्रत्येक पक्षाने सत्तेचे स्वप्न पाहणे क्रमप्राप्त आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली.
त्यापूर्वी भाजपनेही सत्तेत येण्याचा वेगवेगळ्या मार्गानी प्रयत्न केला. दोन वर्षांचा काळ गेल्यानंतरही महाराष्ट्र सारख्या प्रगतशील आणि सक्षम राज्याची सत्ता आपल्याकडे नाही याचे शल्य भाजपला आहे.
त्यातूनच महाविकास आघाडीतील नेत्यांना विविध मार्गाने टार्गेट केले जात आहे.
लोकशाहीत महाराष्ट्रातील लोकांनी जो निर्णय दिलेला आहे, त्याच्या अनुसरून आमदारांनी आणि तीन राजकीय पक्षांनी निर्णय घेऊन सत्ता स्थापन केली.
राजकारणात ही गोष्ट मनाचा मोठेपणा दाखवून विरोधकांनी मान्य करायला हवी.
मंत्री मुश्रीफ यांच्या बाबतीत जे काही घडत आहे ते दुर्दैवी आहे.
मुश्रीफ यांची पाठराखण करताना सतेज पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे, सामान्य माणसाशी नाळ जुळलेल्या त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने गेली चाळीस वर्ष राजकारणापलीकडे जाऊन समाजकारणाचा वसा घेतला आहे.
सामान्य माणसासाठी त्यांच्या घराचा दरवाजा पहाटेपासून उघडा असतो. निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप होत राहतात.
परंतु निवडणूकीनंतर जनतेने निर्णय दिल्यावर एखाद्या लोकप्रतिनिधीच्या व्यक्तिगत मागे लागणे हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे.
मंत्री मुश्रीफ यांच्याबाबत यापूर्वीच अनेक चौकशा झाल्या आहेत. त्यांची इन्कम टॅक्सची चौकशी विधानसभा निवडणुकी अगोदर झाली आहे.
चौकशीचे निरसन ज्या-त्या वेळी झाले आहे. ही माहिती नियमानुसार वेब साईट्वर उपलब्ध आहे. अशा वेळी पुन्हा त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे, असेही मंत्री पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.
हेही वाचा :