भक्तजनप्रिय श्री विठ्ठल Pudhari File photo
संपादकीय

भक्तजनप्रिय श्री विठ्ठल

आषाढी एकादशीला विठ्ठलाचा गजर

पुढारी वृत्तसेवा
प्रा. म. रा. जोशी, संत वाङ्‌मय संशोधक

आषाढी एकादशीला ‘श्री पुंडलिक वरदा हरि विठ्ठल। जय जय हरी विठ्ठल।’ या गजराने अवघे पंढरपूर दुमदुमून जाते. हा घोष समस्त वारकरी संप्रदायाचा गाभा आहे. श्री हरी हा विठ्ठल आहे व तो पुंडलिकाला वर देणारा आहे. श्री हरी हा परमात्मा कृष्ण आहे. तो विष्णू आहे. श्रीकृष्ण ‘तच्च संमृत्य संमृत्य रुपम अव्यद्भूतम हरेः’ असा श्रीकृष्णाचा उल्लेख गोपी करतात. हरी हे श्रीकृष्णाचेच नाव आहे व ही दोन्ही नावे विष्णूचीच आहेत. भक्तराज पुंडलिकाच्या भेटीसाठी साक्षात परब्रह्म विठ्ठलरूपाने भीमातीरावर पंढरपुरी प्रकट झाले. श्री विठ्ठल भक्तजनप्रिय आहे. जेथे भक्त असतात तेथे विठ्ठल असतो.

गोष्ट आहे शके 1734 (इ.स. 1832) ची, आरफळकर, तासकर आणि खानदेशचे निष्ठावंत वारकरी खंडूजीबुवा आणि शिरवळकर या वारकर्‍यांची! ज्ञानदेव महाराजाच्या आदेशाप्रमाणे, द़ृष्टांताप्रमाणे आरफळकर आळंदीला ज्ञानदेव मंदिरात आले. चौघांनी माऊलीला साष्टांग नमस्कार घातला. आरफळकरांनी, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठला’चा नामघोष केला. ‘ज्ञानदेव तुकारामा’चा नामघोष केला. माऊलींच्या पादुका शिरावर घेतल्या. प्रदक्षिणा घातली आणि ‘विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल’ म्हणत चौघांनी पंढरीची वाट धरली. या क्षणापासून पालखीला प्रारंभ झाला. आरफळकर, शिरवळकर, तासकर, खंडोजी बुवा पंढरपूरला निघाले. विठ्ठल पंढरपुरी निघाले. दिंडी-दिंडीतून गावोगावीचे, विदर्भाचे आणि कोकणचे, आंध्राचे आणि कर्नाटकचे वारकरी पंढरपूरला, आषाढी एकादशीला नामसंकीर्तन करीत नामघोष करीत जाऊ लागले. एकादशीव्रतस्थ विठ्ठल भक्त विष्णुशयनोत्सवासाठी पंढरपूरला येऊ लागले. व्यक्तीशः दिंडी-दिंडी रूपाने, आपापल्या फडासह वारकरी सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाऊ लागले. वारकर्‍यांचे, विठ्ठल भक्तांचे पंढरपूरला येणे ही एक अखंड क्रिया आहे. या प्रक्रियेला प्रारंभ आहे; पण शेवट नाही अशी ही वारकर्‍यांची दिशा आहे.

वारकर्‍याच्या दिंडीला, वारीला प्रारंभ झाला तो द्वारकेहून. कृष्णदेव हे दिंडीरवनात आहेत. म्हणून रुक्मिणी दिंडीरवनात द्वारकेहून निघाली. तिच्या मागोमाग गोकुळामधून गोपवृंद आले. राधा आली. रुक्मिणी, राधा, गोपवृंद-गोपाल कृष्णदर्शनासाठी पंढरपूरला आले. येथे कृष्ण विठ्ठलरूपात आहे. ज्या स्थानी कृष्ण विठ्ठलरूपात आला ते स्थान दिंडीश शिवाचे होते. येथे शिव दिंडीश नावाने यति, योगी, जनात प्रसिद्ध होता. दिंडीश हा शब्द, हे नाव कर्नाटकातील शिलालेखातही आढळते. दिंडीश, दिंडीरवन आणि दिंडी ही तिन्ही नावे वारकरी संप्रदायात, विठ्ठल भक्तांत प्रसिद्ध आहेत. हा दिंडीश शिव पांडुरंग नावानेही प्रसिद्ध आहे. पांडुरंग नावावरून ‘पंडरगे’ हे ग्रामनाम कन्नड भाषेत आणि शिलालेखांत प्रसिद्ध झाले. ‘पंडरग विठ्ठल’ असा पंढरपूरच्या विठ्ठलाचा उल्लेख शके 1159 मधील शिलालेखांत येतो. हा लेख संस्कृत-कन्नड भाषेत असून तो पंढरपुरातील मंदिरावर कोरला आहे. या लेखात कर्नाटकचा राजा वीर सोमेश्वर पंढरपूरला वारीसाठी आला होता. याच लेखात पुंडलिकाचाही उलेख आहे. येथून आपणाला तीन-चार शिलालेख मिळू लागतात. त्यामधून नामदेव-ज्ञानदेव आणि पूर्वकालांतील वारकरी, फड आणि वारकरी संप्रदायाची माहिती मिळते.

या महितीचा मागोवा घेत घेत आपण गेलो की, शके 450 पर्यंत येतो. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य भारत, आंध्र, गुजरात, कोकण, विदर्भात विठ्ठलाची पूजा होत होती हे ताम्रपटातून व शिलालेखांवरून कळून चुकते आणि ज्ञानदेवपूर्व काळातील विठ्ठल भक्त आपल्याला भेटू लागतात. आपल्याला ज्ञानदेव-तुकाराम आणि तुकारामोत्तर आजपर्यंतचा वारकरी संप्रदाय माहीत आहे; पण पुंडलिक, ज्ञानदेव, नामदेव आणि त्यांच्या कालखंडातील वारकरी आणि वारकरी संप्रदायाचे स्वरूप समजण्यासाठी ताम्रपट आणि शिलालेख मदत करतात. स्कंद आणि देवी भागवत पुराणातून पंढरपूरचे, पुंडलिकाचे उल्लेख आलेले आहेत. स्कंदपुराणात 12 अध्यायांचे पंढरी माहात्म्य आहे. तथापि, ही तिन्ही बरीच प्राचीन आहेत. पुराणात ज्याची गणना होते असे ‘मत्स्यपुराण’ आहे. या पुराणात पंढरपूरचा उल्लेख लोहदंड तीर्थक्षेत्र पुंडरिकपूर असा येतो. मत्स्यपुराणाचा काल. इ.स. 500-600 आहे. या पुराणात येणारा पुंडरिकपूर हा पंढरपूचा आणि भक्तराज पुंडलिकाचा उल्लेख हेच स्पष्ट करतो की, शके 422 मध्ये पुंडरिकाची पुराण परंपरा पसरलेली होती. याच पुराणात पांडुरंगपल्लीचा ताम्रपट आहे. हा ताम्रपट आणि मत्स्यपुराणाच्या अभ्यासावरून पुंडलिक महाराजांचा कालखंड आणि त्यांची भक्तराज म्हणून कीर्ती शके 350-400 मध्ये सर्वत्र पसरली होती आणि ज्ञानदेव-नामदेवांपूर्वी भक्तराज पुंडलिक 1 हजार वर्षांपूर्वी होऊन गेले, तेव्हापासून विठ्ठल भक्तांना भेटण्यासाठी विटेवर उभा आहे. गरुडपार म्हणजे गरुड खांब. याचा उल्लेख वारकरी संत वारंवार करतात. पूर्वी याच स्थळावरून कीर्तनास प्रारंभ होत असे. गरुड हा विठ्ठलाचा-विष्णूचा वाहक आहे. गरुड खांबाजवळून पुढे गेले की, ज्याच्या दर्शनासाठी भक्त आसुसलेले असतात ते परब्रह्म श्री विठ्ठलरूपाने साकार होऊन भक्तांना भेट देण्यासाठी उभे राहिलेले दिसून येते. भक्तराज पुंडलिकाच्या भेटीसाठी साक्षात परब्रह्म विठ्ठलरूपाने भीमातीरावर पंढरपुरी प्रकट झाले त्यावेळी श्रीविठ्ठलाची शोभा दिव्य होती. समवेत रुक्मिणीदेवी व राधा होत्या. प्रकट झालेले भगवंत विटेवर उभे होते. त्यांचे नेत्र कमलाप्रमाणे सुंदर होते. वर्ण मेघाप्रमाणे नील होता. त्यांचे स्तवन देव मधूरवाणीने करत होते. तेव्हा ब्रह्मसाक्षात्कारी ज्ञानी मागे कसे राहतील? तेही मोठ्या संतोषाने भगवंताचे श्री विठ्ठलाचे स्तुतीस्तोत्र गाऊ लागले. असा हा भक्तजनप्रिय श्री विठ्ठल आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT