महायुतीचा विजय

महाराष्ट्रात झालेल्या विधान परीषदेच्या निवडणूकीत महायुतीचा विजय
victory of Vidhan Parishad elections
विधान परीषदेच्या निवडणूकीत महायुतीचा विजयPudhari File Photo

लोकसभा निवडणुकीत आणि त्यामागोमाग विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांतील यशामुळे महाविकास आघाडीमध्ये (मविआ) उत्साहाचे वातावरण होते; पण विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीचा विजय झाल्यामुळे मविआला धक्का बसला. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपसह महायुतीला चांगलाच फटका बसला होता. त्यात भाजपचे केवळ नऊच उमेदवार निवडून आले. भाजपचा स्ट्राईक रेट कमी होता. आगामी विधानसभा निवडणुकीत मविआला 288 पैकी 225 तरी जागा मिळतील, असा आत्मविश्वास या आघाडीचे शिल्पकार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केला होता. या आघाडीतील काँग्रेस, तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेनेचे नेतेही महायुतीची सत्ता आता तीन महिनेच आहे, त्यानंतर आम्हीच सत्तेत येणार आहोत, अशा गर्जना करू लागले होते. त्यामुळे महायुतीच्या आत्मविश्वासावर परिणाम झाला होता. वास्तविक लोकसभा निवडणुकीतही महायुती व मविआच्या मतांमध्ये जेमतेम अर्धा टक्का इतकाच फरक होता आणि त्यामुळे बावचळून जाण्याचे काही कारण नाही.

victory of Vidhan Parishad elections
पॅथॉलॉजी लॅब्जना लगाम

विरोधी पक्षांनी तयार केलेल्या नॅरेटिव्हला प्रभावीपणे उत्तर दिले पाहिजे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली होती. त्यातच ‘ऑर्गनायझर’ या संघाच्या मुखपत्रात युतीमधील अजित पवार गटाबद्दल तिखट टीका प्रसिद्ध झाली होती. या टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी भाजपचे महाराष्ट्रातील नेते पुढे आले नाहीत, याबद्दलची नाराजी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली होती. विधानसभेच्या जागा कोणाला किती द्यायच्या, यावरूनही तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या मागण्या पुढे होत होत्या. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर अजित पवार गटाचे 18 ते 20 आमदार आमच्याकडे येतील, असे भाकित आमदार रोहित पवार यांनी केले होते. एकनाथ शिंदे गटाचे काही आमदार उबाठामध्ये येतील, असेही बोलले जात होते; परंतु विधान परिषद निवडणुकीत प्रत्यक्षात वेगळेच घडले! 2022च्या जूनमध्ये राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांत भाजपने मोठे यश मिळवले होते. या निवडणुकांत मविआची आणि खासकरून काँग्रेसची मते फुटली आणि मतदान करून शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार एक-एक करून सुरतला पळून गेले. त्यानंतर ठाकरे सरकारच कोसळले. दहा दिवसांनी शिंदे मुख्यमंत्री झाले आणि फडणवीस उपमुख्यमंत्री. यावेळी विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्याने कोणता उमेदवार पराभूत होणार, याचीच चर्चा सुरू झाली. मतांची होणारी फाटाफूट टाळण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा प्रयत्न झाला, तरी माघार कोण घ्यायची, यावर एकमत झाले नाही. उबाठाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अचानक उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत रंगत निर्माण झाली होती. आमचाच उमेदवार निवडून येणार, असे ठाकरे यांनी ठामपणे सांगितल्यामुळे पडणारा, म्हणजेच 12 वा उमेदवार कोण असेल, याबद्दलचे औत्सुक्य होते. विजयासाठी पहिल्या पसंतीची 23 मते आवश्यक होती. संख्याबळानुसार भाजपचे पाच, शिवसेना शिंदे गटाचे दोन आणि काँग्रेसचा एक व अजित पवार गटाचा प्रत्येकी एक उमेदवार हमखास निवडून येऊ शकत होताच. 12 वा उमेदवार हा अजित पवार गटाचा, उबाठाचा की जयंत पाटील, यापैकी कोण ठरेल हे सांगता येत नव्हते. गुप्त मतदान असल्याने मतांची फाटाफूट होणार, याची कल्पना सर्वांनाच होती.

victory of Vidhan Parishad elections
हिमालयातील बर्फ आटतोय

दोन वर्षांपूर्वी विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता; परंतु त्यावेळी काँग्रेसचे दुसर्‍या उमेदवारासाठीच क्रॉस व्होटिंग झाले होते. यावेळी अजित पवार गटाचे दुसर्‍या पसंतीचे उमेदवार शिवाजी गर्जे हे पडण्याची शक्यता असल्याचे भाकित मविआच्या काही नेत्यांनी जाहीरपणे केले होते. प्रत्यक्षात भाजपला त्याच्या संख्याबळापेक्षा 6 मते जास्त, शिंदेंना दोन-तीन, तर अजित पवार यांच्या उमेदवाराला पाच मते जास्त मिळाली. काँग्रेसची मते फुटतील, असा अंदाज त्याच पक्षाच्या एका आमदाराने व्यक्त केला होता; मात्र महायुतीचे नऊच्या नऊ उमेदवार निवडून आले. भाजपची ताकद चार उमेदवार निवडून आणण्याची असूनही त्यांनी सदाभाऊ खोत या पाचव्या उमेदवारास निवडून आणले. अजित पवार गटाचे एकूण 42 आमदार असले, तरी पक्षाच्या दोन उमेदवारांना मिळालेल्या मतांची संख्या 47 होती. लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघात शिवसेनेच्या अनंत गीते यांना शेकापच्या जयंत पाटील यांनी मदत न केल्यामुळे उबाठाने त्याचे उट्टे काढले. उलट शरद पवार यांनी शेकापच्याच उमेदवाराला पाठिंबा आहे, असे जाहीर करून टाकले होते. काँग्रेसनेही पहिल्या पसंतीची दोन मते आपल्याला द्यावीत, अशी जयंत पाटील यांची अपेक्षा होती, ती पूर्ण झाली नाही. याचा अर्थ, मविआमध्येच अंतर्गत मतभेद आहेत, त्याचा भाजपने पुरेपूर लाभ उठवला. महायुतीतील तिन्ही पक्ष एक आहेत आणि आगामी विधानसभाही आम्ही एकजुटीने लढवणार आहोत, असे संकेत देण्यात महायुती यशस्वी ठरली आहे. महायुतीने आमिषे दाखवून हा विजय मिळवल्याचा आरोप मविआ नेत्यांनी केला आहे. यापूर्वीच्या विधान परिषद निवडणुकांमध्ये आपण आमिषे दाखवण्याचे प्रकार कधीच केले नाहीत, असे छातीठोकपणे हे नेते सांगू शकतात का? त्याचप्रमाणे आपले तिन्ही उमेदवार निवडून आणण्याची खात्री नव्हती, तर दोनच उमेदवार उभे करणे आवश्यक होते. राजकारणात थोड्याच यशाने हुरळून जाणे आणि अतिआत्मविश्वास या दोन्ही गोष्टी टाळणे आवश्यक असते. सात राज्यांत विधानसभेच्या तेरा जागांवरील नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने दहा जागा जिंकल्या, तर भाजपला केवळ दोन ठिकाणी विजय मिळाला. त्यामुळे हवा सतत बदलत असते, हे भाजप व त्याच्या मित्रपक्षांनाही लक्षात ठेवावे लागेल. महाराष्ट्रात विधानसभेचे घोडामैदान जवळच असून, तोपर्यंत आमदार व नेत्यांची आणखी फाटाफूट संभवते; परंतु शेवटी जनतेचे मन व मत कोण जिंकतो, यावरच सामन्याचा निकाल अवलंबून असणार आहे.

victory of Vidhan Parishad elections
दूध माफियांना रोखाच!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news