हवामान बदलामुळे हिमालयात बर्फाचे प्रमाण कमी राहिले.  Pudhari File Photo
संपादकीय

हिमालयातील बर्फ आटतोय

हवामान बदलामुळे हिमालयात बर्फाचे प्रमाण कमी

पुढारी वृत्तसेवा
रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक

हिमालयाच्या वितळणार्‍या बर्फापासून निर्माण होणार्‍या पाण्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांना यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. हवामान बदलामुळे हिमालयात बर्फाचे प्रमाण कमी राहिले असून, त्यामुळे पाण्याची कमतरता जाणवू शकते, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, यावर्षी हिमवृष्टी कमी झाल्याने हिमालयाच्या पर्वतरांगा पुरेशा प्रमाणात बर्फच्छादित झाल्या नाहीत. मागच्या आठवड्यात जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, वितळणार्‍या बर्फापासून 12 प्रमुख नद्यांना पाणी मिळते. नद्यांच्या एकूण पाण्यापैकी एक चतुर्थांश स्रोत बर्फाच्या पाण्याचा आहे. यांचा उगम हिमालयातून होतो. अहवालाचे लेखक शेर मोहंमद यांच्या मते, बर्फ कमी झालेले प्रमाण देशाच्या धोरणकर्त्यांना आणि नदीच्या खालच्या भागात राहणार्‍या समुदायासाठी धोक्याची घंटा आहे. शेर मोहंमद हे नेपाळ येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माऊंटने डेव्हलपमेंटमध्ये (आयसीआयएमओडी) काम करतात. त्यांच्या मते, बर्फ कमी होत असल्याने आणि त्याचे प्रमाण कमी-जास्त राहत असल्याने पाण्याची टंचाई निर्माण होण्याचा धोका राहू शकतो. प्रामुख्याने यावर्षी त्याची तीव्रता अधिक जाणवू शकते.

‘आयसीआयएमओडी’च्या मते, हिमालयातील बर्फ हा या भागातील सुमारे 24 कोटी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. याशिवाय खालच्या भागात खोर्‍यातील सुमारे 1 अब्ज 65 कोटी लोकांसाठीही हा स्रोत महत्त्वाचा मानला जातो. वास्तविक दरवर्षी बर्फाचे प्रमाण कमी-जास्त होत राहते; मात्र शास्त्रज्ञांच्या मते, हवामान बदलामुळे पावसाचे वेळापत्रक बदलले आहे आणि हवामानाच्या स्वरूपातही फरक जाणवत आहे. या अहवालात ‘स्नो पर्सिस्टेन्स’ म्हणजे बर्फ जमिनीवर राहण्याचा काळाचे आकलन केले आहे. यावर्षी हिंदकुश आणि हिमालयाच्या भागात त्याचे प्रमाण सामान्य स्तरांच्या सुमारे पाचपट कमी झाले आहे. यावर्षी बर्फ हा सामान्य पातळीच्या 18.5 टक्के तुलनेत कमीच राहिला आहे. गेल्या 22 वर्षांतील हा दुसरा नीचांक आहे. 2018 च्या कमी राहणार्‍या बर्फाने 19 टक्क्यांपर्यंतची नीचांकी पातळी गाठली होती. या तुलनेत यंदा थोडा अधिक बर्फ राहिला आहे. नेपाळव्यतिरिक्त अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, चीन, भारत, म्यानमार आणि पाकिस्तानसारख्या देशांतही ‘आयसीआयएमओडी’चे सदस्य आहेत. या अहवालात म्हटले आहे की, पाण्याच्या प्रवाहाचा काळ आणि वेग यात बदलाचे संकेत मिळत आहेत.

हंगामानुसार पाण्याची उपलब्धता निश्चित करण्यासाठी बर्फाची प्रमुख भूमिका असते. या संस्थेकडून या भागातील बर्फावर दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून लक्ष ठेवले जात आहे. त्यांच्या मते, 2024 मध्ये बर्फाच्या स्थितीत लक्षणीय बदल जाणवले. भारतीय नद्यांत सर्वाधिक कमी स्नो पर्सिस्टन्स आढळून आला आणि तो सरासरी 17 टक्क्यांपेक्षा कमी होता. 2018 मध्ये हा आकडा 19 टक्क्यांवर होता. म्हणजेच सध्याची स्थिती चिंताजनक आहे. अफगाणिस्तानात हेलमंड नदीच्या प्रवाहात दुसरी सर्वात कमी स्नो पर्सिस्टन्सची पातळी आढळून आली आणि ती सामान्य स्थितीच्या 32 टक्के एवढी कमी आहे. सिंधू नदीच्या प्रणालीतील बर्फाचे प्रमाण सामान्य स्थितीच्या 23 टक्क्यांपेक्षा कमी आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रणालीत सामान्य स्तरापेक्षा 15 टक्के कमी स्तर आढळून आला. वरिष्ठ क्रायोस्फियर मिरियम जॅक्सन यांनी सर्व स्थितीचे आकलन करता हिमालयाच्या पायथ्याशी पुराच्या स्थितीचा सामना करण्यासाठी अधिकार्‍यांनी पुरेशी तयारी करावी, असे आवाहन केले आहे.

गेल्या शंभर वर्षांत पृथ्वीचे तापमान सरासरी 0.74 टक्क्याने वाढले आहे; मात्र हिमालयाच्या भागात जागतिक सरासरीपेक्षा अधिक वेगाने तापमान वाढलेले दिसून येते. जून 2023 च्या अहवालात म्हटले आहे की, हवामान बदलामुळे या शतकाच्या शेवटी हिंदुकुश, हिमालय भागात हिमकड्यांची/हिमनद्यांची (ग्लेसियर) व्याप्ती 75 टक्क्यांपेक्षा कमी राहू शकते. त्यामुळे या भागात राहणार्‍या सुमारे 24 कोटी नागरिकांना धोकादायक पुराचा सामना करावा लागू शकतो आणि त्यांना पाण्याची टंचाई जाणवू शकते. एव्हरेस्टवरून पतरणार्‍या गिर्यारोहकांनी पर्वतरांगा या कोरड्या आणि ओक्याबोक्या वाटू लागल्याचे मत मांडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT