टी-२० वर्ल्डकपमध्ये ( T20 WC ) भारत सेमिफायनलमध्ये धडक मारणार का, याच प्रश्नाचे उत्तर क्रिकेट चाहते शोधत आहेत. भारताने काल (दि.५) स्कॉटलंडविरोधात धमाकेदार विजय मिळवत स्पर्धेतील आपले आव्हान जिंवत ठेवले. त्याचबरोबर रनरेटमध्येही खूपच सुधारणा केली. आता अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला तरच भारताला सेमिफायनलमध्ये जाण्याची संधी मिळेल. यासंदर्भात भारताचा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा याला विचारला असता त्याने भन्नाट उत्तर दिले.
टी-२० वर्ल्डकपमधील ( T20 WC ) पहिले दोन सामने भारतीय संघाने गमावले. त्यामुळे भारतीय संघ सेमिफायनलपर्यंत जाण्याची वाट बिकट झाल्याचे मानले जात होते. मात्र भारतीय संघाने अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडविरोधातील सामन्यात धमाकेदार खेळी केली. दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले. आता रनरेट सुधारला आहे. मात्र सेमिफायनलमध्ये जाण्यासाठी न्यूझीलंडचा अफगाणिस्तानने पराभव करणे गरजेचे आहे.
न्यूझीलंडने सामना जिंकला तर भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड हा सामना भारतात चर्चेचा विषय झाला आहे. यासंदर्भात माध्यमांनी रवींद्र जडेजा याला विचारले असताना त्याने असे काही उत्तर दिले की, याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
न्यूझीलंडने उद्याच्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केल्यास पुढे काय? असा सवाल माध्यम प्रतिनिधींd[ जडेजा याला केला. तो म्हणाला, अफगाणिस्तान पराभूत झाल्यास आम्ही बँग पॅक करणार आणि घरी जाण्यासाठी निघणार. जडेजाच्या या उत्तराने हशा पिकला.