Sameer Wankhede : आर्यन खान प्रकरणाच्या तपासाबाबत समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया | पुढारी

Sameer Wankhede : आर्यन खान प्रकरणाच्या तपासाबाबत समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबई एनसीबी झोनल डायरेक्टर सचिन वानखेडे यांना तगडा झटका बसल्याचे बोलले जात आहे. पण समीर वानखेडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आर्यन खान प्रकरणातील तपास यापुढेही मी काम करणार असल्याचे वानखेडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मंत्री नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यात मागच्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. दरम्यान, नवाब मलिकांनी सादर केलेल्या पुराव्यातून समीर वानखेडे चांगलेच अडचणीत आले आहेत. (Sameer Wankhede)

समीर वानखेडे म्हणाले की, मला क्रुझ ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातून वगळण्यात आले नाही. या तपासात मी कायम राहणार आहे. या प्रकरणाचा तपास देशातील महत्वाच्या केंद्रीय एजन्सीसोबत व्हावा अशी मी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे आर्यन खान आणि समीर खान प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीची एसआयटी करत आहे. दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबी टीममध्ये हा एक समन्वय आहे. आम्ही यावर मिळून काम करत असल्याचे समीर वानखेडे यांनी म्हटले आहे.

Sameer Wankhede : आर्यन खान प्रकरणाचा तपास संजय सिंह यांच्याकडे

याचबरोबर एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन म्हणाले, आमच्या झोनच्या एकूण ६ प्रकरणांची चौकशी आता दिल्लीच्या एनसीबी पथकांकडून केली जाणार आहे, या ६ प्रकरणांमध्ये आर्यन खानचे प्रकरण आणि इतर ५ प्रकरणांचा समावेश आहे. हा प्रशासनाने घेतलेला निर्णय आहे.

समीर वानखेडे यांना आर्यन प्रकरणासह ५ केसेसच्या तपासातून बाजूला करण्यात आले होते. आता या सर्व ६ केसेसचा एनसीबीच्या दिल्ली टीमकडून तपास करण्यात येईल. हा प्रशासकीय निर्णय आहे, अशी माहिती एनसीबीच्या दक्षिण पश्चिमी विभागाचे उपसंचालक मुथा अशोक जैन यांनी दिली होती. आर्यन खान प्रकरणाचा तपास संजय सिंह यांच्याकडे देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

‘समीर वानखेडे यांनी धर्मांतर केलेले नाही’

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची कागदपत्रे आपण तपासली असून वानखेडे यांनी धर्मांतर केलेले नाही असे सकृतदर्शनी दिसून येत असल्याचे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी म्हटले आहे.

अरुण हलदर यांनी मुंबई भेटीत समीर वानखेडे यांची भेट घेतली. दोघांत तब्बल तासभर चर्चा झाली. वानखेडे यांनी जातप्रमाणपत्रासह अनेक कागदपत्रे आणि एक निवेदनही हलदर यांना दिले. त्यानंतर हलदर यांनी हा निर्वाळा दिला. हलदर म्हणाले, जातीवरून टीका होत असल्याने वानखेडे यांनी आमच्याकडे तक्रार केली असून, मागासवर्गीय असल्याचे पुरावेही सादर केले आहेत. वानखेडे यांच्याशी बोलताना ते अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचे मला जाणवले.

त्यांचा विवाह स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टनुसार झाला होता. त्यांचे रेकॉर्डही मी तपासले. त्यांनी धर्मांतर केलेले नाही. त्यांच्या जातीबाबत कोणी तक्रार केल्यास आम्ही चौकशी करू. पण कोणताही निर्णय एकतर्फी होणार नाही. या प्रकरणात महाराष्ट्र सरकार काय करते ते पाहू त्यानंतर राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आपले काम करेल, असेही ते म्हणाले.

Back to top button