पुणे शहरातील बांधकाम व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडे १५ लाखांची खंडणीची मागणी करत, खंडणी न दिल्यास गाडीखाली चिरडून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune ransom case) याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक युवराज सिताराम ढमाले (वय ४१, रा. अक्षयनगर, धनकवडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रविलाल देवजीभाई प्रजापती (वय ४०, रा. गोकुळ हॉटेलसमोर, कोंढवा), जितू प्रजापती, आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खंडणीची मागणी जानेवारी २०२१ ते आतापर्यंत सुरु होती, असे फिर्यादीमध्ये म्हटलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवराज ढमाले हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचा कोंढव्यात बांधकाम प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पातील पूर्ण झालेल्या साईटवरील फ्लॅटचा ताबा काही सदस्य वगळता इतर सर्वांना देऊन सहकारी गृहनिर्माण अंतर्गत सोसायटी स्थापन केली आहे. दरम्यान, यावेळी संशयित आरोपी रविलाल प्रजापती यांना देखील फ्लॅटचा ताबा दिला. आरोपींनी फिर्यादी ढमाले यांना सदस्यांची मिटिंग बोलावून कॉमन अॅमिनिटीजचा ताबा अजून आम्हाला दिला नाही, असे सोसायटीच्या सदस्यांना सांगून तुमच्या विरुद्ध तक्रार करायला भाग पाडेन. तसेच तुमची बदनामी करीन, अशी धमकी दिली.
बदनामी करू नये, यासाठी फिर्यादी युवराज ढमाले यांच्याकडे आरोपींनी १५ लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. एवढेच नाही तर खंडणी दिली नाही तर युवराज ढमाले यांना गाडीखाली चिरडून टाकण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादी ढमाले यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी तिघांच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
https://youtu.be/tMd8z_g1-5k