karmala murder: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने पतीचा केला खून, डोक्यात दगडी पाटा घालून केले ठार | पुढारी

karmala murder: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने पतीचा केला खून, डोक्यात दगडी पाटा घालून केले ठार

करमाळा (जि. सोलापूर); पुढारी वृत्तसेवा : karmala murder : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने पतीच्या डोक्यात दगडी पाटा मारून त्याला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी (दि. २१) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. यात पतीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. सुदाम शामराव गायकवाड (वय ५२, रा. खडकी, ता. करमाळा) असे मृताचे नाव आहे. सुनिता सुदाम गायकवाड असे संशयित आरोपीचे नाव आहे. याची फिर्यादी रावसाहेब शामराव गायकवाड (४२, रा खडकी) यांनी करमाळा पोलिसात दिली आहे.

याबाबतची माहिती अशी की, मयत सुदाम व सुनिता हे दोघे पती-पत्नी मोलमजुरी करून खडकी येथे रहात होते. सध्या सुदाम हा म्हैसगाव कारखान्यासाठी बोरगाव (ता. करमाळा) येथे ऊसतोडणी करत होता. तो काही कामानिमित्त खडकी या गावात दोन दिवसापूर्वीच आला होता. तर मुलेही ऊस तोडणीसाठी बाहेर गावी गेलेले होते. संशयित आरोपी सुनिता ही पती सुदाम गायकवाड याच्या चारित्र्यावर संशय घेत होती. त्यामुळे सतत दोघा पती-पत्नीमध्ये वाद व्हायचे, असे फिर्यादीत म्हटले आहे. (karmala murder)

सुदाम-सुनिता या दांपत्याची तीनही मुले उदरनिर्वाहसाठी शिरूर (जि. पुणे), कर्नाटक या ठिकाणी कारखाना सुरू झाल्याने ऊस तोडणी साठी गेलेले होते. त्यामुळे घटना घडली त्यावेळी दोघेच घरी होते. रविवारी पहाटेच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून सुनिता हिने पती सुदामच्या डोक्यात दगडी पाटा घालून झोपेतच त्याला ठार केले. तसेच तिने या कृत्याबाबत आपल्या मुलांना फोन करून पतीला ठार मारल्याचे सांगितले व काहीवेळाने स्वत:हून ती पोलिस ठाण्यात हजर झाली. माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह पाठवला. दरम्यान करमाळा पोलिसांनी संशयित आरोपी सुनिता हिला अटक करून तिला करमाळा येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी प्रशांत घोडके यांच्या समोर उभे केले. यावेळी न्यायाधीश घोडके यांनी संशयित आरोपी सुनिता गायकवाड हिला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. या खूनाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ हे करत आहेत. (karmala murder)

Back to top button