Latest

मंगळवार पेठेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा पहाटे छापा; गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: मंगळवार पेठेतील अप्पा कुंभारच्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने शनिवारी पहाटे पावने तीन वाजता छापा टाकून ३६ जणांवर कारवाई केली. सामाजिक सुरक्षा विभागाने अवैध धंद्याविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईने कुंभार याने नवनवीन युक्त्या शोधून आपला अड्डा सुरू ठेवला होता.

पोलिसांनी अड्डा चालक वीरेश भीमाशंकर कुंभार (वय ३९, रा. मिथिला अपार्टमेंट, दशभुजा गणपती मागे, कर्वे रोड) याच्यासह अड्ड्यावरील ९ कामगार, २० मटका खेळणाऱ्यांना अटक केली आहे. भीमाशंकर ऊर्फ आप्पा इरप्पा कुंभार (६८, रा. नाना पेठ) याच्यासह पाचजण पळून गेले आहेत. या कारवाईत एक लाख ११ हजार १०० रुपयांची रोकड, एक लाख ४७ हजारांचे २९ मोबाईल, दोन लाख ४० हजार रुपयांच्या ६ दुचाकी असा एकूण ६ लाख ८ हजार २५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

आप्पा कुंभार याचे समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला होता. तरीही त्याचा जुगाराचा क्लब जोरात सुरू होता. रात्री साडेअकरा ते पहाटे चारपर्यंत हा क्लब सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळघरात दोन हजार स्क्वेअर फुटांमध्ये क्लब सुरू होता.

एअर कंडिशन्स, पंखे, इन्व्हर्टर, जुगार खेळायला मखमलीचे टेबल्स, लाेखंडी स्टुल्स होते. खेळींना क्लबवर आणायला व सोडायला शुटर्समार्फत मोटारसायकल, स्कूटरची व्यवस्था होती. खेळणाऱ्यांसाठी खाद्यपदार्थांची सोयही होती. एवढेच नाहीत तर क्लबच्या चारही दिशांना, इमारतीच्या आजूबाजूला, नागझरीकडेही सीसीटीव्हीचे कॅमेरे बसविण्यात आले होते.

या कॅमेऱ्याचे कनेक्शन आप्पा कुंभारच्या मोबाईल व घरामध्ये दिसत असे. त्यावरून तो परिसरात कोणी अनोळखी दिसले तर तातडीने क्लबमधील लोकांना सावध करीत असे. क्लबमधील लाईट बंद करून आतील लोक नागझरीच्या मार्गाने बाहेर काढले जात असे. क्लब बंद असल्याचे दाखविण्यासाठी त्याने मेन गेटला मोठे कुलूपही लावले होते.

फक्त ओळखीच्या व नेहमी खेळायला येणाऱ्यांनाच प्रवेश दिला जात होता. मात्र सामाजिक सुरक्षा विभागाने अतिशय चलाखीने या जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणीक यांच्या पथकाने केली.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT