पिंपरी : लग्नाचा तगादा लावल्यामुळे विवाहित प्रियकराने विवाहित प्रेयसीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना थेरगाव येथे उघडकीस आली आहे. थेरगाव व वाकड परिसरात या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे.
राणी विशाल गायकवाड (२६, रा. सम्राट चौक, वाकड) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी अनिकेत महादेव कांबळे (३३, रा. गणेशनगर, थेरगाव) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी राणी गायकवाड घरातून बेपत्ता झाल्याची माहिती कुटुंबीयांनी वाकड पोलिसांना दिली होती. तातडीने पोलिसांनी तिच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले. यात राणी गायकवाड सतत अनिकेत कांबळे यांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वाकड पोलिसांनी अनिकेतच्या हालचालींबाबत माहिती घेतली असता तो नुकताच बार्शी–लातूर भागात गेल्याचे समोर आले.
दरम्यान, वाकड पोलिसांनी अनिकेत याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. सुरुवातीला अनिकेतने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक पुरावे समोर ठेवल्यावर अखेर त्याने खून केल्याची धक्कादायक कबुली दिली.
राणी आणि अनिकेत यांच्यात गेल्या वर्षांपासून प्रेमसंबंध होते. राणी गायकवाड विवाहित असून तिला मुले आहेत. घरातील काही व्यक्तींना या संबंधांची माहिती झाल्याने तिने नवरा व मुलांना सोडून अनिकेतसोबत राहण्याचा हट्ट धरला. अनिकेत हा देखील विवाहित असून त्यालाही मुले आहेत. त्यामुळे तो तिला सोबत ठेवण्यास तयार नव्हता. मात्र, राणीने सातत्याने लग्नाचा तगादा लावल्यामुळे अनिकेत त्रस्त झाला होता.
त्रस्त झालेल्या अनिकेतने राणीचा कायमचा काटा काढण्यासाठी अतिशय शांत डोक्याने प्लॅन केला. अनिकेतने राणीला “गावी नेऊन ठेवतो” असे सांगत कारमध्ये बसवून शहरा बाहेर काढले. प्रवासादरम्यान अनिकेतने वाद सुरू केला. या वादातून अनिकेतने तिचा गळा दाबून जीव घेतला. त्यानंतर लोखंडी पाईपने तिच्या डोक्यावर वार करून मृत्यूची खात्री केली.
खून केल्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी अनिकेतने मृतदेह लातूर–बार्शी हायवेवरील ढोकी गावाजवळ घेऊन गेला. तेथे पेट्रोल ओतून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेह पूर्णपणे जळाला नाही. स्थानिक पोलिसांनी मिळालेल्या माहितीद्वारे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
वाकड पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता अनिकेतने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी हत्या व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न या कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विवाहित स्त्रीचा प्रियकराने असा क्रूरपणे खून केल्याचे समजताच थेरगाव, वाकड आणि परिसरात खळबळ उडाली आहे.