Vallabhnagar Road Pothole Pudhari
पिंपरी चिंचवड

Vallabhnagar Road Pothole: वल्लभनगर भुयारी मार्गावर मोठा खड्डा; वाहनचालक त्रस्त

दुरुस्ती रखडल्याने वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढला

पुढारी वृत्तसेवा

पिंपळे गुरव: वल्लभनगर येथील भुयारी मार्गातून संत तुकारामनगरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मोठा खड्डा पडूनही अद्याप दुरुस्ती न झाल्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना अडथळ्याचा सामना करावा लागत आहे. हा मार्ग संत तुकारामनगर वायसीएम हॉस्पिटल, नेहरूनगर तसेच वल्लभनगर एसटी बसस्थानकाशी जोडलेला असल्याने येथे दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते; परंतु रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दुचाकी, रिक्षा, खासगी वाहने तसेच सार्वजनिक वाहने या रस्त्यावरून नियमितपणे ये-जा करतात. मात्र, या मोठ्या खड्ड्‌‍यामुळे वाहनचालकांना जोरदार धक्के बसत असून, अनेकांना मणक्याचा व पाठीचा त्रास उद्भवत आहे. विशेषतः दुचाकीचालकांना वाहनाचा तोल सांभाळणे कठीण होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यातही या ठिकाणी हीच परिस्थिती होती. त्या वेळी नागरिकांनी व वाहनचालकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे रस्ता दुरुस्तीबाबत विचारणा केली असता सध्या डांबरीकरणाचे काम बंद आहे. पाऊस उघडल्यावर रस्ते दुरुस्त करण्यात येतील, असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. मात्र, पाऊस उघडून जवळपास दोन महिने होत आले तरीही या रस्त्याची अजूनही दुरुस्ती झालेली नाही.

वाहतूक कोंडीची समस्या

पावसाळ्यात खड्ड्‌‍यात पाणी साचल्यामुळे हा खड्डा दिसत नव्हता. सध्या पाणी नसले तरी रस्त्याची दयनीय अवस्था दिसून येत आहे. त्यामुळे वाहनचालक अचानक बेक मारत आहेत किंवा वळसा घेत आहेत. परिणामी या मार्गावर अनेक वेळा वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र आहे. वल्लभनगर एसटी स्थानक हे शहरातील महत्त्वाचे स्थानक आहे. येथे दररोज मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. अशा ठिकाणी रस्त्याची अशी अवस्था प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे दर्शन घडवत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. संबंधित महापालिकाने आश्वासनांची पूर्तता करून तातडीने खड्डा बुजवावा व रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. मेट्रोच्या सुरू असलेल्या कामामुळे दुरुस्तीचे काम तात्पुरते थांबवले आहे. आपल्या विभागाकडे मीनिंग मशीन उपलब्ध आहेत. परवानगी मिळविण्यासाठी पोलिसांकडे आवश्यक पत्रव्यवहार केलेला आहे. परवानगी प्राप्त होताच तात्काळ दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येईल.
राहुल जानू, उपअभियंता, प्रकल्प विभाग, मनपा
वल्लभनगर एसटी स्थानक शहरातील महत्त्वाचे ठिकाण आहे. हा मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. खड्ड्‌‍यांमुळे पाठीला व मणक्याला जोरदार धक्का बसतो. पावसाळ्यानंतर लगेच दुरुस्ती होईल, असे सांगितले होते पण अजूनही काहीच झालेले नाही.
सचिन सोनवणे, स्थानिक नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT