

पिंपरी: थंडीमुळे चहा, अंडी, ज्वारी - बाजरी अशा उष्मांक वाढविणाऱ्या पदार्थांना नागरिकांकडून मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कडाक्याची थंडी पडली आहे. सकाळी आणि रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या कर्मचारी, नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. थंडीसाठी ऊबदार कपडेच नाही, तर उष्मांक वाढविणारा आहारही घ्यावा लागतो. त्यामुळे दिवसभरात चहा पिण्याचे प्रमाण वाढले आहे.
रस्त्यांवर विविध स्वादाचे चहा पहायला मिळतात जसे गुळाचा चहा, ब्लॅक टी, मलई चहा, बासुंदी चहा, लेमन टी, ग्रीन टी, इराणी चहा, जास्वंद चहा, काश्मीरी कहावा अशा विविध प्रकारच्या चहाचा आस्वाद नागरिक घेत आहेत.
चहा उत्साहवर्धक असल्याने पहिला चहा आणि नंतर इतर कामे करणारा मोठा वर्ग पहायला मिळतो. वर्षभर चहा हवाच असतो पण थंडीमध्ये मात्र, चहाची जास्त तलफ येते. थंडीचा कडाका असल्याने सकाळी उठल्यानंतर चहा पिण्यासोबत दिवसभर चहा पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. चहाच्या प्रत्येक टपरीवर, हॉटेलमध्ये वेगवेगळे दर आहेत.
रोगप्रतिकार शक्तीसाठी थंडीमध्ये अंड्यांना मागणी वाढली आहे. पावसाळ्यामध्ये सहा रुपयांना मिळणारे अंडे साडेसात ते आठ रुपयांना विकले जात आहे. ही दरवाढ पुढील दोन महिने कायम राहण्याची शक्यता आहे. थंडी वाढल्याने मागणी आणखी वाढू शकते. थंडीच्या दिवसात पौष्टिक आणि उष्ण खाद्य म्हणून अंड्यांची मागणी नेहमीच वाढते. यावर्षी थंडी वाढल्याने मागणीत मोठी वाढ झाली आहे.
बाजरीही उष्ण असल्याने थंडीमध्ये खाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच ज्वारी गव्हाच्या तुलनेत आरोग्यास लाभदायक असल्याने ज्वारीलाही मागणी वाढली आहे. मात्र, यंदा सतत पडणाऱ्या पावसामुळे बाजारी व ज्वारीच्या उत्पादनात घट झाल्याने ज्वारी आणि बाजरीचे दर तेजीत आहेत. ज्वारी आणि बाजरी 50 ते 60 रुपये किलो दराने विक्रीस आहे. हल्ली उच्चभू्र कुटुंबातील नागरिक देखील ज्वारी खाणे पसंत करतात. त्यामुळे यांचे दर कितीही वाढले तरी बाजारी आणि ज्वारी खाण्याकडे ग्राहकांचा कल आहे.