

पिंपरी: काळेवाडीतील तापकीर चौक येथील दोन फटाक्यांच्या दुकानांना गुरुवारी (दि. 1) सायंकाळी सहाच्या सुमारास आग लागली. या आगीत दोन्ही दुकाने भस्मसात झाली. फटाक्यांच्या सातत्याने होणाऱ्या स्फोटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले.
काळेवाडी येथील तापकीर चौक शेजारी असणाऱ्या माऊली गॅस एजन्सी या दुकानाशेजारी दोन फटाका विक्रीची दुकाने आहेत . गुरुवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास एका फटाका दुकानात अचानक आग लागली. त्यानंतर ही आग शेजारीच असणाऱ्या दुसऱ्या फटाका दुकानामध्येही पसरली.
या दुकानांमध्ये फटाक्यांचा हजारो किलोचा साठा असल्याने काही मिनिटातच आगीने रौद्ररूप धारण केले. दुकानातील फटाक्यांचे एका पाठोपाठ स्फोट होऊ लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. या आगीमुळे रस्त्यांवर बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
घटनेची माहिती मिळताच पिंपरीतील मुख्य अग्निशमन केंद्रासह इतर उपकेंद्राच्या अशा एकूण 14 बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीचे रौद्ररूप बघून पुणे महापालिकेचा बंबही पाचरण करण्यात आला. सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. रात्री दहा वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
रुग्णालयातील रुग्ण सुरक्षितस्थळी हलवले
इमारतीच्या तळमजल्यात फटाक्यांची दोन दुकाने असून या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर रुग्णालय आहे. या रुग्णालयात काही रुग्णही उपचारासाठी दाखल होते. फटाक्यांच्या दुकानाला आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर पसरला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ रुग्णालयातील रुग्णांसह परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळ हलविले. त्यामुळे कोणीही जखमी झले नाही.