उर्से मावळ: मावळ तालुक्यातील उर्से गावात 5 वर्षांच्या एका चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी उर्से ग््राामस्थ, अखंड मराठा समाज आणि सर्वपक्षीय संघटनांच्यावतीने सोमवारी (दि. 29) मावळ बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
उर्से गावातील या घटनेने संपूर्ण पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. कधी थांबणार या घटना?, असा संतप्त सवाल विचारत संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मावळमधील सर्व जाती-धर्माचा मराठा समाज आणि नागरिक एकवटले आहेत. एका निष्पाप परप्रांतीय चिमुरडीला न्याय मिळवून देण्यासाठी पक्षीय भेद विसरून सर्व संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
उद्या तळेगाव फाटा येथे होणार महामोर्चा
निषेध व्यक्त करण्यासाठी सोमवारी सकाळी 10 वाजता तळेगाव-चाकण चौक, ज्योतिर्लिंग मंदिर, जुना मुंबई-पुणे हायवे आणि तळेगाव-वडगाव फाटा या ठिकाणी निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उर्से ग््राामस्थ आणि अखंड मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.
कडक पोलिस बंदोबस्त तैनात
या घटनेमुळे मावळमधील सामाजिक वातावरण अत्यंत संवेदनशील बनले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी तळेगाव आणि उर्से परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.