तळेगाव स्टेशन: सध्या वनखात्यासमोर ग्रामीण भागात बिबट्यांमुळे आणि तळेगाव दाभाडे नगर परिषदेसमोर कुत्र्यांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ग्रामीण भागात बिबटे आणि शहरी भागात कुत्र्यांचे मोठे आव्हान आहे. ग्रामीण भागात इंदोरी, धामणे, वराळे, आंबी आदी परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत आहे.
बिबटे दिवसभर ऊसासारख्या दाट पिकांमध्ये आडोशाला लपतात आणि रात्री-अपरात्री नागरी वस्तीत येऊन हल्ले करून जीवितहानी करतात. बिबट्यांच्या हल्ल्यात कित्येक लहान मुलांचे, नागरिकांचे, महिलांचे, जनावरांचे, पाळीव कुत्र्यांचे बळी गेले आहेत. रात्री-अपरात्री ग्रामीण भागात एकट्या दुकट्याला घराबाहेर पडण्याची सोयच राहीली नाही. बैल, गायी, म्हशी, शेळ्या आदी जनावरे घरात तर बांधता येत नाहीत. बाहेर गोठ्यातच बांधावी लागतात. जनावरांचे मालक रात्रभर जनावरांजवळ थांबू शकत नाहीत. जनावरे मोकळी सोडावीत, तर शेतातील पीक खातात. यामुळे शेतीचे नुकसान होत असल्यामुळे ती बांधावीच लागतात.
बिबट्या आला तर बांधलेल्या जनावरांना पळूनही जाता येत नाही आणि प्रतिकारही करता येत नाही, अशी जनावरांची अवस्था होत आहे. यामुळे बिबट्यांचे फावते ते जनावरांवर हल्ला करतात; तसेच शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी विद्युत पंपासाठी वीजपुरवठा नसल्यामुळे रात्रीअपरात्री पिकास पाणी देण्यासाठी, दारी धरण्यासाठी एकट्यालाच जावे लागते आणि शेतात अनेक तास थांबावे लागते. यामुळे शेतकऱ्यांना फारच धोकादायक आहे. प्रत्येक वेळी सोबतही कोणाला घेता येत नाही. प्रत्येकांची शेती वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे एकत्रही थांबता येत नाही. यामुळे बिबट्यांचे साधते.
तळेगाव दाभाडे आदी शहरी भागात भटक्या कुत्र्यांच्या वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही कुत्री दिवसभर आणि रात्री अपरात्री टोळक्यांनी वावरतात. येणाऱ्या जाणाऱ्यांना चावतात. अनेकांचा त्यांनी चावा घेतला आहे. तळेगाव परिसरात उर्से, नवलाख उंबरे आदी ठिकाणी एमआयडीसी आहे. यामुळे अनेक कामगार तळेगाव येथून रात्री-अपरात्री कामावर ये जा करतात. त्यांना या कुत्र्यांचा फारच त्रास होतो. ते वाहनांचा पाठलाग करतात, गाडीच्या मागे धावतात, गाडीला आडवे येतात, यामुळे अनेक वेळा अपघात होऊन जीवितहानी झालेली आहे. भविष्यातही होण्याची शक्यता आहे.
कुत्र्यांमुळे शहरवासीय त्रस्त
ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना आणि विद्यार्थ्यांना, लहान मुलांना हे फारच त्रासदायक होत आहे. ही कुत्री इमारतीच्या पार्किंगमध्ये येतात, घाण करतात. रात्री-अपरात्री ही कुत्री मोठमोठ्याने भुंकतात, भेसूर आवाज काढतात. यामुळे तेथील रहिवाशांना वृध्दांना फारच त्रासदायक होत आहे. अनेकांची झोपमोड होत आहे. तरी प्रशासनाने या बिबट्यांचा आणि भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याबाबत ठोस कार्यवाही करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
रात्री, अपरात्री ऊस आदी पिकांस पाणी देण्यासाठी बिबट्यांच्या भीतीने जीव मुठीत घेऊन शेतात जावे लागते. तरी वनखात्याने याबाबत ठोस कार्यवाही करावी.दशरथ ढोरे, प्रगतिशील शेतकरी, इंदोरी.
सध्या भटक्या कुर्त्यांमुळे परिसरात वावरणे फारच धोकादायक झाले आहे. तरी प्रशासनाने दखल घ्यावी.चंद्रकांत सावंत, सामाजिक कार्यकर्ता