पिंपरी: शहरात मोकाट जनावरांबरोबरच भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दररोज कुत्र्याने नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडतात. अशा वेळी मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर येतो. कुत्र्यांना महापालिकेचे कर्मचारी पकडून नेतात. त्यांच्यावर नसबंदी करून पुन्हा परिसरात सोडतात. तरीदेखील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे महापालिकेकडून करण्यात येणारे निर्बिजीकरण फक्त कागदावरच असल्याचे दिसून येते.
काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री समूहाने फिरत असतात. रस्त्यावर पडलेले खाद्यपदार्थ खाण्यावरून त्यांच्यात भांडणे लागतात. रस्त्यावर गोंधळ घालणार्या या कुत्र्यांचा वाहने व पादचार्यांना त्रास होतो. परिसरातील नागरिक त्यांना हाकलण्यासाठी सरसावतात. त्यामुळे कधी कधी कुत्री चवताळून नागरिकांच्या अंगावर धावून जातात व चावा घेतात.
भटके श्वान झुंडीने फिरत असतात. रात्रीच्या किंवा पहाटेच्या वेळी कामावरून येणार्या नागरिकांच्या अंगावर धावून जातात. बर्याचदा किशोरवयीन मुले प्राण्यांची खोड काढतात, अशा वेळी प्राणी आक्रमक होऊन चावा घेतात. अनेक ठिकाणी सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये भटकी कुत्री फिरत असतात. रात्री-अपरात्री ही कुत्री ओरडत असतात. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, अभ्यास करणारे विद्यार्थी यांना त्रास होतो.
शहरात दर महिन्याला जवळपास हजारांहून अधिक कुत्र्यांनी चावा घेतल्याची रुग्णालयात नोंद आहे. अद्यापही भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणले नाही, तर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. प्राणिप्रेमी संस्थांनी भटक्या कुत्र्यांना न मारता त्यांची नसबंदी करण्याचा तोडगा काढला आहे. यामध्ये कुत्र्यांच्या लहान पिलांना हात लावता येत नाही. त्यामुळे दर वर्षी भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळेच भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
निर्बिजीकरण फक्त कागदावरच
नसबंदी करूनही भटक्या कुत्र्यांची संख्या कमी झालेली दिसून येत नाही. एका कुत्र्यावर 999 रुपये इतका शस्त्रकियेचा खर्च येतो. यासाठी महापालिकेने 2 कोटी रुपयांची तरतूद केली होती.
पालिकेमार्फत खर्च
यापूर्वी महापालिकेने कुत्रे पकडण्याचे काम एका खासगी संस्थेला दिले होते. या संस्थेची डॉग व्हॅन येऊन शहरातील प्रभागानुसार फिरुन रोज 15 ते 20 भटकी कुत्री पकडत होती. मात्र, 2022 नंतर कुत्रे पकडण्याचे काम बंद होते. आता यासाठी महापालिका स्वत: ची यंत्रणा राबवित आहे. तसेच निर्बिजीकरणाचे कामदेखील पालिकेमार्फत नेमलेल्या डॉक्टरांकडून केले जाते.
शस्त्रक्रियेवर झालेला खर्च
कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी 2021 - 22 दरम्यान पालिकेकडून 2 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्या वेळी शस्त्रक्रिया करण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर 2022 - 25 दरम्यान, सीएसआर फंडातून निर्बिजीकरणावर खर्च करण्यात आला त्याची आकडेवारी पालिकेकडे नाही. सध्या दोन महिन्यांपासून पालिका स्वत: निर्बिजीकरणावर खर्च करत आहे.
वर्ष निर्बिजीकरणावर झालेला खर्च
2020 - 21 2 कोटी रुपये
2021 - 22 1.35 कोटी रुपये
2022 - 23 निरंक (सीएसआर)
2023 - 24 निरंक (सीएसआर)
2024 - 25 निरंक (सीएसआर)
कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी पालिकेने चार सर्जन आणि कर्मचारी नेमण्यात आले आहेत. कुत्रे पकडण्यासाठी चार वाहने आहेत. पाच दिवस कुत्र्यांना देखभालीसाठी ठेवण्यात येते. गेल्या दोन वर्षामध्ये निर्बिजीकरणाचा खर्च सीएसआर फंडातून करण्यात आला आहे. आता दोन महिन्यांपासून पालिका खर्च करत आहे.डॉ. अरुण दगडे (पशुवैद्यकीय अधिकारी)