

मोडले कंबरडे
सोमाटणे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने अनेक इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. पैठणीचे कार्यक्रम, देवदर्शन, सहली, गाव भेट दौरे, दिवाळीनिमित्त भेटवस्तू वाटप अशा एक ना अनेक कार्यक्रमांमुळे इच्छुकांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. गेली अनेक दिवस निवडणूक लागेल या आशेवर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या इच्छुकांची बँक खाते रिकामी होण्याच्या मार्गावर आहेत, परंतु ओबीसी आरक्षणावर मंगळवारी सुनवणी होणार असल्यामुळे इच्छुकांचा जीव टागणीला लागला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील 246 नगर परिषदा व 42 नगरपंचायतींचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार येत्या दोन डिसेंबरला या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका पाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लागतील या आशेवर सर्व इच्छुक धडाडीने कामाला लागले होते. अक्कलकोट, कोल्हापूर, त्रिंबकेश्वर अशा सहलींचे आयोजन करत हजारो महिलांच्या उपस्थितीत होणारे पैठणीचे कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये लाखो रुपये खर्च झाले, परंतु राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 27 टक्के ओबीसी आरक्षणाचा वाद आडवा आला व हा वाद मीटेपर्यंत नामांकन प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार का करत नाही? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला केल्याने यासंबंधी सुनावणी (मंगळवारी) 25 नोव्हेंबर रोजी होणार असून, या सुनावणीपर्यंत राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होणार नाही. येत्या मंगळवारी कोणता निर्णय होतोय याकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 ते 19 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. त्यामुळे या कालावधीत निवडणुकांची घोषणा होण्याची चिन्ह कमी आहे. नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबर रोजी लागणार आहेत. त्यानंतर अवघ्या 6 दिवसांत हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने 19 डिसेंबर नंतरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच लागतील या आशेवर असणाऱ्या इच्छुकांना आता किमान चार महिने थांबावे लागते की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. नगर परिषद व नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अनेक इच्छुक झपाटून कामाला लागले होते. लाखो रुपये खर्च करून पुन्हा एकदा निवडणुका लांबणीवर पडतात की काय? अशी धास्ती इच्छुकांना सतावत आहे.
सोमाटणे परिसरात जिल्हा परिषदेसाठी सोमाटणे-चांदखेड गटाचा समावेश आहे. तर, पंचायत समितीसाठी सोमाटणे व चांदखेड या गणांचा समावेश आहे. त्यात एकीकडे सोमाटणे, शिरगाव,ख गहूंचे येथील उच्चभ्रू सोसायटीतील मतदार तर दुसऱ्या बाजूला ग्रामीण मतदारांचा समावेश आहे. निवडणुकीत महायुती फिस्कटली तर भाजप-राष्ट्रवादीतच लढत होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. सोमाटणे गणात 22811 तर चांदखेड गणात 22964 इतकी मतदार संख्या आहे. सोमाटणे-चांदखेड गटात एकूण 45,775 इतकी मतदार संख्या असल्याने या सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान इच्छुकांसमोर आहे. येथे अनेक इच्छुक आतापासून कामाला लागले आहेत.