

नवी सांगवी : संत शिरोमणी सावतामाळी उद्यानात लहान मुलांसाठी बसविण्यात आलेल्या खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या बालचमूंचा हिरमोड होताना दिसून येत आहे. ते म्हणतात सांगा आम्ही उद्यानात झोका खेळायचा की नाही? उद्यानात झोके खेळण्यासाठी आहेत मात्र अनेक झोके तुटलेल्या अवस्थेत आहेत.
नवी सांगवी येथील महापालिकेच्या संत शिरोमणी सावतामाळी उद्यानात सायंकाळच्या सुमारास बालचमूंनी गजबजलेले असते. मात्र गेली काही महिने येथील उद्यानात उभारण्यात आलेल्या खेळण्यांची दुरवस्था झालेली असताना देखील उद्यान विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. येथील उद्यानात खेळताना काही तुटलेल्या खेळण्यांमुळे शारीरिक ईजा अथवा गंभीर जखम बालचमूंना होण्याचा धोका आहे.
सदर उद्यान सांगवी परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांच्या विरंगुळ्यासाठी गेली काही वर्षे उपयुक्त ठरत आहे. मात्र, आजमितीला या उद्यानाची दिवसेंदिवस दुरवस्था होत चालली आहे. खरेतर महापालिका प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. नागरिकांनी उद्यानात जावे की नाही अशी परिस्थिती सद्यस्थितीत आहे.
बालचमूंना उद्यानाचा आसरा आपलासा वाटतो. त्यामुळे बालचमू उद्यानामध्ये गर्दी करतात. मात्र, उद्यानातील सुविधाच व्हेंटिलेटरवर असतील तर त्याचा वापर बालचमूंना कसा करता येईल? हा खरा प्रश्न आहे. याबाबत उद्यान विभागाने तातडीने दखल घेऊन संत शिरोमणी सावतामाळी उद्यानातील खेळण्यांची दुरुस्ती तसेच स्वच्छतागृहाची स्वच्छता तातडीने करावी, अशी मागणी उद्यानप्रेमींकडून होत आहे.
उद्यानातील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे उद्यानात दुर्गंधी पसरत आहे. डासांची उत्पत्ती निर्माण झाली आहे. उद्यानात काही ठिकाणी तारेचे कुंपण केले आहे. यामध्ये पाला पाचोळा वाढलेली झाडे, वेली, गवत दिसून येत आहेत. या कुंपणामध्ये जुनी तुटलेली खेळणी, आदी साहित्य सामग्री अस्ताव्यस्त पडलेली आहेत. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक उद्यानाची पाहणी केली आहे. महापालिका उद्यान विभागामार्फत उद्यान दुरुस्ती व देखभाल निविदा प्रक्रिया सुरू आहेत. या प्रक्रियेनंतर उद्यानातील खेळण्या नादुरुस्त अथवा खराब झाल्या आहेत. त्याविषयी कार्यवाही सुरू होईल. उद्यानासंबंधीच्या इतरही गोष्टी, समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.
महेश गारगोटे, उद्यान अधीक्षक, मनपा.