वर्षा कांबळे
पिंपरी: अभिजात मराठी भाषा सन्मान दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील एका आगळ्या उपक्रमाची चर्चा होत आहे. पिंपळे गुरव येथील डॉ. नीलाक्षी काळे-साळके यांनी आयटी क्षेत्रात सीनिअर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करीत असतानाच मराठी भाषासंवर्धनासाठी 'मातृगंध फाउंडेशन' सुरू केले असून, या माध्यमातून आजवर १३५० हून अधिक वाचनसत्रे पूर्ण केली आहेत. 'मातृगंध'ने अमेरिका-दुबईतील मराठी मुलेही जोडली आहेत.
दि. २६ जून २०२१ रोजी त्यांनी हा उपक्रम सुरू केला. सभोवतालची मुले मराठी बोलताना इंग्रजी शब्द वापरतात, मराठी विषय अवघड जातो, असे सांगतात. हे पाहून त्यांनी दर रविवारी ५ ते १५ वयोगटातील मुलांसाठी ऑनलाइन वाचनकट्टा सुरू केला.
'एक तास-एक सत्र' या पद्धतीने बालसाहित्य वाचन, निबंध, पत्रलेखन, वक्तृत्व याचे धडे दिले जातात. विशेष म्हणजे पुणे, मुंबई, ठाणे, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे; तर अमेरिका, कॅनडा, यूके, ऑस्ट्रेलिया आणि दुबई येथील मराठी मुलेही या उपक्रमात सहभागी होतात.
राज्यात सहा वाचनालये सुरू
'मातृगंध'च्या वतीने तळेगाव दाभाडे, भोर, श्रीगोंदा, अमरावती येथे स्वातंत्र्यवीर सावरकर, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने ६ वाचनालये सुरू करण्यात आली आहेत. 'बीड वाचतंय' या अभियानासाठी ५०० पुस्तके, तर दौंड येथील 'कलाम वाचनालयाला' १७५ पुस्तके भेट देण्यात आली आहेत. मातृभाषेला मित्रभाषा बनवा, मात्रभाषा बनवून मृतभाषा बनवू नका, असे ब्रीद जपत त्या हा उपक्रम निःशुल्क चालवतात.
'मातृगंध'ची सुरुवात एका छोट्या विचारातून झाली. माझ्या आजूबाजूची मराठी मुलेही मराठी बोलताना इंग्रजी शब्द वापरतात, हे पाहून वाईट वाटले; म्हणून दर रविवारी 'एक तास, एक सत्र' असा वाचनकट्टा सुरू केला. आज १३५० हून अधिक सत्रे झाली आहेत. आज महाराष्ट्रासोबतच अमेरिका, कॅनडा, दुबई, यूकेमधील मुलेही आमच्या कट्ट्याला जोडली गेली आहेत. तळेगाव, भोर, श्रीगोंदा, अमरावती येथे आम्ही ६ वाचनालये सुरू केली आहेत.डॉ. नीलाक्षी काळे, संस्थापिका, मातृगंध फाउंडेशन