

पिंपरी: शेअर बाजारातील मोठा तोटा आणि डोक्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी तरुणाने मित्राची १४ लाख रुपये किमतीची कार चोरून ती राजस्थानमध्ये विकण्याचा डाव आखला. मात्र, बावधन पोलिसांनी तब्बल १२ तास पाठलाग करून धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे आरोपीला कारसह पकडले.
रोहन सत्यनारायण सोमानी (२६, रा. वाघोली, पुणे; मूळ रा. भिलवाडा, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रथम सोमेश्वरदास गुप्ता यांनी याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीकडून १४ लाख रुपये किमतीची होंडा एलिव्हेट कार हस्तगत केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता यांची नवीन होंडा एलिव्हेट कार २७ सप्टेंबर रोजी चोरीला गेली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासासह परिसरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यातून आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.
दरम्यान, आरोपी कार घेऊन पुण्याबाहेर पडल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांना चकवा देत तो वाघोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि चाळीसगावमार्गे धुळ्याच्या दिशेने निघाला होता. बावधन पोलिसांचे पथकही त्याच्या मागावर होते. जवळपास १२ तासांच्या सलग पाठलागानंतर शिरपूर परिसरात आरोपीला कारसह ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत सोमानी याला शेअर बाजारात मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले. हा तोटा भरून काढण्यासाठी त्याने वडील तसेच इतरांकडून पैसे उधार घेतले होते. कर्ज फेडण्याचा मार्ग न दिसल्याने मित्राची कार चोरून ती राजस्थानला नेऊन विकण्याचा त्याने कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सारंग ठाकरे आणि पथकाने केली. पुढील तपास बावधन पोलिस करीत आहेत.