Pimpri Public Safety Hazards Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Public Safety Hazards: शहर सुशोभीकरणाच्या झगमगाटात सुरक्षेचा बोजवारा; पिंपरीत उघडी मॅनहोल, धोकादायक विद्युत पेट्या, झुकलेली झाडे

रस्त्यांवरील जीवघेणे धोके ‘पुढारी’च्या पाहणीत उघड; अपघातापूर्वी उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

बजरंग मासाळ

पिंपरी: शहर सुशोभीकरणाच्या नावाखाली महापालिकेकडून शहर परिसरात विकासकामे करण्यात येत आहेत; मात्र ही कामे सुरु असताना दुसरीकडे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या बाबींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव आहे. शहरातील विविध भागांत पुढारी प्रतिनिधीने पाहणी केली असता, स्टॉर्म वॉटर लाईनचे चेंबर उघडेच, मॅनहोल, खचलेल्या भिंती, धोकादायक अवस्थेतील विद्युत पेट्या, झुकलेली झाडे तसेच रस्त्यावर कोसळलेले लोखंडी फलक अशा धोकादायक स्थितीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे; परंतु याकडे पाहण्यास संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याने त्यांना शहरवासीयांच्या जीवाचे मोल नसल्याचे अधोरेखित होत आहे.

लोखंडी फलक रस्त्यावर; ‘सूचना’च बनली धोक्याची

पालिकेकडून लावण्यात आलेले काही सूचना फलक तसेच अर्बन स्ट्रीट परिसरातील जाहिरातींचे मोठे लोखंडी पत्रे व फलक उखडून रस्त्यावर आडवे पडल्याचे दिसते. हे फलक वाहनचालक किंवा पादचाऱ्यांच्या अंगावर पडल्यास गंभीर दुखापत होऊ शकते. अशा फलकांची मजबुती तपासणे आणि धोकादायक फलक तातडीने हटविणे आवश्यक आहे.

झुकलेली झाडे

शहरातील काही ठिकाणी झाडे एका बाजूला मोठ्या प्रमाणात झुकलेली दिसतात. जोरदार वारा किंवा वादळी पावसात ती रस्त्यावर, वाहनांवर अथवा नागरिकांवर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. वृक्ष विभागाने धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून छाटणी किंवा आवश्यक ती उपाययोजना करणे गरजेचे आहे.

उघड्या विद्युत पेट्या: ‘करंट’चा थेट धोका

रस्त्यालगतच्या काही विद्युत पेट्यांना योग्य प्रकारे कुलूपबंद नसल्याचे आढळले. पावसाळ्यात पाणी साचलेल्या परिसरात हा धोका अधिक गंभीर ठरू शकतो. संबंधित विभागाने अशा पेट्यांची तातडीने तपासणी करून सुरक्षित कव्हरिंग आणि लॉकिंग व्यवस्था करावी.

मॅनहोल उघडेच; अपघाताची वाट पाहतेय यंत्रणा?

काही ठिकाणी मॅनहोलची झाकणे गायब अथवा उघडी असल्याचे दिसते. गर्दीच्या रस्त्यावर किंवा पादचारी मार्गावर असा मॅनहोल म्हणजे थेट मृत्यूचा सापळाच. तात्पुरते बॅरिकेडिंग न करता कायमस्वरूपी झाकण बसविणे आवश्यक आहे.

धोके हटविण्यासाठी केवळ पाहणी नको !

नागरिकांच्या जीवाशी संबंधित अशा बाबींमध्ये तक्रार आल्यानंतर कारवाईपेक्षा पालिकेने ‘धोकादायक ठिकाणांचा विशेष सर्वेक्षण अभियान’ राबविणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रभागात उघडी मॅनहोल, स्टॉर्म वॉटर लाईन, विद्युत पेट्या, धोकादायक भिंती, झुकलेली झाडे आणि फलक यांची यादी तयार करून त्यावर तातडीने उपाययोजना करावी. धोकादायक ठिकाणी तत्काळ बॅरिकेडिंग, सूचना फलक, रात्री प्रकाश व्यवस्था आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. अपघात होण्यापूर्वी धोका ओळखून तो दूर करणे हीच प्रशासनाची खरी जबाबदारी आहे

खचलेल्या भिंती

पादचारी मार्गालगत तसेच ज्येष्ठ नागरिक बसतात त्या परिसरातील काही भिंती खचलेल्या अवस्थेत आहेत. या भिंती आणखी कोसळल्यास तेथे बसलेल्या नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. धोकादायक भिंती हटवून त्याठिकाणी भिंतीची पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे.

सूचना फलक अथवा बॅरिकेडिंगचा पत्ता नाही!

शहरातील विविध भागांत रस्त्यालगत तसेच पादचारी मार्गांवर कंत्राटदारांकडून कामे सुरू आहेत. मात्र, अनेक ठिकाणी काम सुरू असल्याचे सूचना फलक, योग्य बॅरिकेडिंग अथवा वाहनचालकांना सावध करणारी कोणतीही पूर्वसूचना दिसून येत नाही. काही ठिकाणी कंत्राटी वाहने थेट रस्त्याच्या कडेला उभी करून काम सुरू असल्याने वाहनचालकांना अचानक अडथळ्याला सामोरे जावे लागते.

उघडे स्टॉर्म वॉटर लाईन

स्टॉर्म वॉटर लाईनवरील झाकणे गायब आहेत किंवा काही ठिकाणी ते चेंबर उघडेच आहे. त्यामुळे पादचारी, दुचाकीस्वार तसेच लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. रात्रीच्या वेळी हा धोका आणखी गंभीर होतो. या ठिकाणी त्यावर झाकण बसवून त्याची मजबुती तपासणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT