

देहूगाव: सर्व जाती-धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने राहणारे आणि विविध सण-उत्सव एकोप्याने साजरे करणारे देहूरोड शहर गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देहूरोड पोलिस ठाण्याच्या वतीने गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पूर्वनियोजन बैठक घेण्यात आली. या बैठकीत मंडळांच्या विविध अडचणींवर चर्चा झाली. त्याचवेळी ‘डीजे’ व अतितीव्र ध्वनिक्षेपकाला फाटा देत पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची ग्वाही अनेक मंडळांच्या प्रतिनिधींनी दिली.
बैठकीस पोलिस परिमंडळाच्या अधिकारी श्वेता खेडकर, सहायक पोलिस आयुक्त प्रवीण मोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे, कैलास पानसरे, ज्योती वैरागर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी पोलिस अधिकारी, प्रशासनाचे प्रतिनिधी, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शांतता कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी बबन पिंजण, अजय लांघे, संजय पिंजण, अक्षय वागघमारे, भरत नायडू, देवराम भेगडे, अतुल मराठे, अनिरुद्ध काळोखे, सागर लांगे, अनिस शेख आदींनी मनोगत केले.
पावसात मंडप गळणार नाही याची दक्षता घ्या, गणेशमूर्ती बसवल्यानंतर तिथं मंडळाचा एक स्वयंसेवक ठेवावा, मूर्तीची विटंबना होणार नाही याची काळजी घ्या आणि डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन परिमंडळ ४ च्या पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी केले आहे. शिवसेनेचे रमेश जाधव यांनी सांगितले, की देहूरोडला मिनी इंडिया संबोधतात. या ठिकाणी विविध जाती-धर्मांचे नागरिक सर्व सण एकत्रितपणे शांततेत साजरे करीत असतात. गणेशोत्सवातही सर्वांना समान न्याय व समान नियम लागू झाले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, मिरवणुकीच्या मार्गावरील झाडांच्या फांद्या, लोंबकळणाऱ्या वायरी आदी धोकादायक बाबींची महावितरण, कॅन्टोन्मेंट बोर्ड व संबंधित प्रशासनाने उत्सवापूर्वी पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली.
विसर्जनासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी
किवळे गाव येथील नदीघाटावर परिसरातील अनेक गावांमधील मंडळे विसर्जनासाठी येतात. त्यामुळे विसर्जनाच्या काळात पोलिस बंदोबस्त वाढविण्याची मागणी करण्यात आली. नदीप्रदूषण टाळण्यासाठी हार, फुले, नारळ आदी साहित्य नदीत न टाकता त्याची स्वतंत्र व्यवस्था मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.
नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या...
ज्योती वैरागर यांनी गणेशोत्सव हा सर्वांचा सण असून, मंडप किंवा मिरवणुकीमुळे नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा होणार नाही, याची प्रत्येक मंडळाने काळजी घ्यावी, असे आवाहन केले. गणपती हा विघ्नहर्ता आहे; कोणाला त्रास देणारा नाही. त्यामुळे मंडळांनी नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेऊन उत्सव आनंदात साजरा करावा, असे ज्योती वैरागर यांनी सांगितले. बैठकीत उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी मंडळांच्या सूचनांची दखल घेत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मंडळांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करून शांतता, सामाजिक सलोखा आणि कायद्याचे पालन राखत गणेशोत्सव साजरा करण्याची ग्वाही दिली.
वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर
देहूरोड शहरातील वाहतूक कोंडीचाही मुद्दा बैठकीत प्रकर्षाने मांडण्यात आला. मिरवणुकांच्या काळात रस्त्यांवर वाहने उभी राहिल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. प्रमुख मार्गांवर चार-पाच वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने रस्ता अरुंद होतो. त्यामुळे मिरवणूक निघाल्यानंतर वाहतूक सुरळीत करताना मोठी अडचण निर्माण होते. मामुर्डी परिसरातील काही सोसायट्यांमधील नागरिक पर्यायी मार्ग उपलब्ध असतानाही गावातील मुख्य रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे मिरवणुकीच्या वेळी वाहतूक कोंडी वाढते. या मार्गावर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. देहूगाव परंडवाल मैदानाकडून जाणाऱ्या पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतुकीची एक लेन वळविल्यास मुख्य रस्त्यावरील कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, अशी सूचनाही माळीनगरमधील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली.
वायरी, झाडांच्या धोकादायक फांद्या तोडा
मिरवणूक मार्गावर लोंबकळणाऱ्या विद्युत तारा, जुन्या वायरी आणि रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे दुर्घटनेचा धोका निर्माण होतो. मागील वर्षी विद्युत तारांमुळे अनुचित घटना घडल्याचा संदर्भ देत उत्सवापूर्वीच महावितरण व कॅन्टोन्मेंट प्रशासनाने संयुक्त पाहणी करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. मार्गावरील वायरी व झाडांच्या फांद्यांचा विचार करून मिरवणुकीतील गणेशमूर्ती, रथ व सजावटीची उंची निश्चित करावी, असे आवाहन देहूरोड विभागाचे पोलिस उपायुक्त प्रवीण मोरे यांनी केले.
‘डीजे’बंदी केवळ गणेशोत्सवापुरता नको
या बैठकीत ‘डीजे’बंदीच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली. गणेशोत्सव हा पुण्याची सांस्कृतिक ओळख असल्याचे सांगत उत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी मंडळांनी सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले. डीजेवर बंदी असेल तर ती केवळ गणेशोत्सवापुरती मर्यादित न राहता सर्व धर्मांच्या व सर्व सणांच्या कार्यक्रमांना समान नियम लागू झाले पाहिजेत. कायदा सर्वांसाठी समान असावा, अशी मागणी कैलास पानसरे यांनी या वेळी केली. सार्वजनिक गणेशोत्सवामागील लोकमान्य टिळकांची सामाजिक एकजुटीची संकल्पना कार्यकर्त्यांनी समजून घेण्याची गरज आहे. डीजेवर मोठा खर्च करण्याऐवजी पारंपरिक वाद्ये, स्थानिक कलाकार, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी माझ्या चारही मंडळांत डीजे लावला जाणार नाही. आम्ही पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी ग्वाही रघुवीर शेलार यांनी दिली.