पिंपरी: ऐन सणासुदीच्या दिवसांत साखर आणि गुळाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरात साखरेचा भाव ८२ रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.
साखर आणि गुळाच्या दरात गेल्या महिन्यापासून सातत्याने वाढ होत आहे असून, त्याची झळ सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापासून मिठाई, चहा दुकानदार, बेकरी व्यावसायिकांला लागली आहे. काही दिवसांपूर्वी ३५ ते ४० रुपये किलो असलेली साखर आता ८२ रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
दरम्यान, म्हशीचे दूध ९० ते १०० रुपये लिटर झाले आहे. तुपाचे दर ७०० ते ८०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. खवा, पनीर आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे मिठाई तयार करण्याचा खर्च वाढला आहे. त्याचा भार आता ग्राहकांच्या खिशावर पडत आहे.
मिठाईचे दरही भडकले
काजूकतलीचा भाव सध्या सुमारे १३०० ते १४०० रुपये किलो आहे. पेढे ६७० ते ८००, मोतीचूर लाडू ५०० ते ५५० तर रसमलाईचा दर ७०० ते ७५० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे.
चहा व्यापाऱ्यांनाही बसली झळ
साखर आणि दुधाचे दर वाढल्याने टपरीवरील चहाच्या दरातही वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी गायीचे दूध ६२ रुपये लिटर होते ते आता ते ६४ रुपये लिटर झाले आहे. त्यामुळे चहाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दहा ते पंधरा रुपयांना मिळणारा चहा आता वीस रुपयांवर गेला आहे.
साखेरच्या दरात अचानक मोठी वाढ झाली आहे. दर वाढणार असल्याने सांगत काही व्यापारी स्टॉक करतात. लहान व्यापाऱ्यांना स्टाॅक करणे शक्य होत नाही. दरातील अनिश्चितता लहान व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान करते. तसेच, सर्वसामान्याच्या खिशाळा झळ बसत आहे.रविदार कदम, व्यापारी