

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील मोकाट व भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून तातडीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत मोकाट श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया (निर्बीजीकरण) करणे, रेबिज प्रतिबंधक लसीकरण करणे, त्यानंतर श्वानांच्या कानावर चिन्ह करणे, जखमी श्वानांवर उपचार करणे आदी कामे खासगी संस्था विनामोबदला करणार आहे.
महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत भटके श्वान संतती नियमन केंद्र तसेच, नेहरूनगर येथे पशुवैद्यकीय दवाखाना व ट्रामा केअर सेंटर सुरू आहे. ते कामकाज प्राणी कल्याण क्षेत्रात कार्यरत असणार्या अशासकीय संस्थेमार्फत विनामोबदला तत्त्वावर काम करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिका खर्चात बचत होणार आहे. ते काम पुण्यातील कर्मा फाउंडेशन करणार आहे.
ती संस्था श्वान संतती नियमन केंद्र, ट्रामा केअर सेंटरचे कामकाज करणार आहे. मोकाट व भटक्या श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया (निर्बीजीकरण) करणार आहे. कुत्र्यांचे रेबिज प्रतिबंधक लसीकरण करणार आहे. त्यानंतर कुत्र्यांच्या कानावर मायक्रोचिपद्वारे कायमस्वरूपी चिन्हांकन केले जाणार आहे. शस्त्रक्रिया केल्यानंतर श्वानांची देखभाल केली जाणार आहे. नेहरूनगर दवाखाना येथे जखमी श्वानांवर उपचार, खाद्य पुरवणे इत्यादी कामे संस्था विनामोबदला करणार आहे. या कामासाठी पशुवैद्यकीय अधिकारी, पॅरा पशुवैद्यकीय कर्मचारी, प्राणी हाताळणारे कर्मचारी, सहाय्यक मनुष्यबळ संस्था स्वखर्चाने नेमणार आहे. तसेच, औषधे, लसी, शस्त्रक्रिया साहित्य, उपभोग्य वस्तू, उपकरणे आदी व्यवस्था संस्था करणार आहे.
त्या संस्थेला महापालिकेकडून श्वान संतती नियमन केंद्र (डॉग पाऊंड), नेहरुनगर येथील पशुवैद्यकीय दवाखाना , ट्रॉमा केअर सेंटरची जागा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रत्येक श्वानासाठी स्वतंत्र पिंजरा उपलब्ध करून दिला जाणार आहे. श्वान पकडण्याच्या पथकासह, सीसीटीव्ही कॅमेरे प्रणाली तसेच, सुरक्षाव्यवस्था पुरवली जाणार आहे. महापालिका व संबंधित संस्थेसोबत करारनामा करून कामकाज सुरू करण्यास स्थायी समितीने ऐनवेळी मान्यता दिली आहे.
मोकाट श्वान पकडण्यासाठी चार वाहने
मोकाट व भटके श्वान पकडण्यासाठी महापालिकेने चार वाहने भाड्याने घेण्यात आली आहेत. त्या प्रत्येक वाहनांवर प्रत्येकी 2 मजूर नेमले जाणार आहेत. तीन वर्षांसाठी त्यासाठी दोन एजन्सीची नेमणूक करण्यासाठी आली आहे. प्रत्येक दिवसाला प्रत्येक वाहनास 12 तासांसाठी 4 हजार 780 रुपये शुल्क दिले जाणार आहे. त्यावर तीन वर्षांसाठी एकूण 2 कोटी 6 लाख 34 हजार रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. शहरात 10 क्षेत्रीय कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. वाहनांची मागणी झाल्यास निश्चित दराने ती वाहने भाड्याने घेण्यात येणार आहे.
महापालिका सभागृहात नगरसेवकांचा रोष
शहरात मोकाट श्चानांची संख्या वाढत आहे. मोकाट कुत्र्यांकडून नागरिकांना विशेषत: लहान मुलांना चावे घेण्याचे प्रकार सतत घडत आहे. त्यामुळे नागरिकांसह नगरसेवकांकडून तक्रारी करण्यात येत आहेत. या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही त्यावर नगरसेवकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची आग्रही मागणी करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्या मुद्द्यावर आंदोलन केले होते. तसेच, या पूर्वी सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात आयुक्तांना कुत्र्यांची प्रतिकात्मक बाहुली भेट दिली होती.
पशुवैद्यकीय विभागाकडून तातडीने उपाययोजना
शहरातील मोकाट श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेकडून तातडीने उपाययोजना केल्या जात आहेत. श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार मनुष्यबळ वाढण्यात येत आहे. तसेच, मोकाट श्वान पकडण्यासाठी वाहने व मजूर पुरवठा करण्यासाठी एजन्सीही नेमली आहे. कुत्री निवारा केंद्रांच्या जागा अंतिम करण्याची कार्यवाही सुरू आहे, असे महापालिकेचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.