पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागामार्फत मालमत्ताकर वसुलीसाठी शहरभर जप्ती मोहीम कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरातील 18 विभागीय कार्यालयांमार्फत झालेल्या कारवाईत आत्तापर्यत एकूण 80 आस्थापना आणि सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत.
करसंकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सर्व सहायक मंडल अधिकाऱ्यांना थकबाकीदारांवर कोणतीही सूट न देता कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. शहरातील सव्वापाच लाखांहून अधिक नागरिकांनी आतापर्यंत 724 कोटी 61 लाख रुपयांचा मालमत्ता कराचा भरणा केला आहे. मात्र, काही थकबाकीदारांना वारंवार सूचना व नोटिसा देऊनही बिल भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने जप्तीची थेट कारवाई सुरू केली आहे.
थकबाकी वसुलीसाठी विभागनिहाय स्वतंत्र पथके तयार करण्यात आली असून, संबंधित थकबाकीदारांना जप्ती नोटीस बजावण्यात आल्या आहेत. अधिपत्र बजावल्यानंतरही बिल न भरल्यास मालमत्तांवर प्रत्यक्ष जप्तीची कारवाई केली जात आहे. या मोहिमेंतर्गत निवासी थकबाकीदारांचे नळ जोड खंडित करण्यात येत आहे. बिगरनिवासी थकबाकीदारांच्या मालमत्तांना थेट सील लावून जप्त केले जात आहे. नागरिकांनी चालू आर्थकि वर्षातील तसेच, थकीत मालमत्ता कर तात्काळ भरून जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, 18 विभागीय कार्यालयांतील गटप्रमुखांना रोजच्या आढाव्यानुसार जबाबदारी देण्यात आली असून, शहरातील निवासी व बिगरनिवासी थकबाकीदारांवर सातत्याने कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे.
थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध करणार
ज्या थकबाकीदारांनी अद्यापही मालमत्ताकराचा भरणा केलेला नाही, अशांची यादी महापालिकेमार्फत प्रसिद्ध केल्यानंतर संबंधितांकडून करण्यात येणारी कोणतीही तक्रार ग््रााह्य धरली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी तात्काळ कर भरणा करून जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ध्वनीक्षेपकाद्वारे बिल भरण्याचे आवाहन
थकबाकीदारांनी मालमत्ताकर भरून जप्ती कारवाई तसेच, नळजोड खंडित करण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन करत शहरात रिक्षा फिरत आहेत. रिक्षावर लावलेल्या स्पीकरवरून नागरिकांना बिल भरण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे थकबाकीदार नागरिक बिल भरणा करत असल्याचे चित्र आहे.
18 विभागीय कार्यालयाच्या पथकांमार्फत कारवाई सुरू राहणार
पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी मालमत्ताकर हा अत्यंत महत्त्वाचा महसूल स्रोत आहे. या कराच्या माध्यमातून पायाभूत सुविधा, नागरी सेवा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा व शिक्षण व्यवस्था सक्षमपणे राबवली जाते. वारंवार सूचना देऊनही काही थकबाकीदारांकडून कर भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महापालिकेने आता कोणतीही सूट न देता थेट जप्तीची कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई 18 विभागीय कार्यालयांमार्फत सातत्याने सुरू राहील, असे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सांगितले.
वेळापत्रकानुसार जप्ती कारवाई
मालमत्ताकर थकबाकीदारांची अचूक माहिती, क्षेत्रनिहाय नियोजन आणि वेळापत्रकानुसार कारवाई या तीन बाबींवर भर देऊन ही मोहीम राबवली जात आहे. प्रत्येक विभागीय कार्यालयामार्फत रोजच्या आढाव्यानुसार प्रगती तपासली जात आहे. थकबाकीदारांनी तातडीने कर भरणा केल्यास जप्ती व नळ जोड खंडित करण्यासारखी कारवाई टाळता येईल. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कर भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे करसंकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.