

तळेगाव दाभाडे: ‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 1 जून 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत राबविण्यात आले. यामध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषदेला विभाग स्तरीय पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. राज्यातील 422 नागरी स्थानिक संस्था व 27 हजार 895 ग््राामपंचायती अशा एकूण 28 हजार 317 स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता.
‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मूल्यमापन व फिल्ड मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणांमार्फत करण्यात आले. या दोन्ही मूल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे माजी वसुंधरा अभियान 5.0 मधील लोकसंख्या निहाय 14 गटातील विजेते तसेच महसूल विभाग व जिल्ह्याच्या एकूण कामगिरीवरून सर्वोत्तम विभागीय आयुक्त, सर्वोत्तम जिल्हाधिकारी व सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची शासनाच्या मान्यतेनंतर निवड करण्यात आली आहे.
नगर परिषद व नगरपंचायत गट चाळीस हजार ते एक लक्ष लोकसंख्या गटात तळेगाव दाभाडे नगर परिषदेला विभाग स्तरीय पहिला क्रमांक तर राज्यस्तरीय पाचवा क्रमांक प्राप्त झाला आहे. यानुसार, नगर परिषदेला 75 लाखांचे रोख पारितोषिक जाहीर झाले आहे.
या रोख रकमेच्या बक्षिसांपैकी 50 टक्के रकमेचा पहिला हप्ता तळेगाव दाभाडे नगर परिषदेस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत तात्काळ वितरित करण्यात येणार आहे. तर उर्वरित 50 टक्के रकमेचा दुसरा हप्ता नगरपरिषदेने केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्यानंतर वितरित करण्यात येणार आहे. सदर बक्षीस रकमेचा विनियोग हा निसर्गाच्या पंचतत्वांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठीच्या उपाययोजना हाती घेण्यासाठी करण्यात यावा, असा शासन निर्णय असल्याची माहिती मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली.
यावर्षी विभाग स्तरीय पहिला क्रमांक तर राज्यस्तरीय पाचवा क्रमांक मिळाल्याचा आनंद आहे. परंतु येत्या काळात राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी मी व सर्व नगरसेवक प्रशासनाबरोबर प्रयत्नशील राहू अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी दिली. या यशाबद्दल सर्व तळेगावकरांना शुभेच्छा!