Pawana Dam Pudhari
पिंपरी चिंचवड

Pawana Dam Water Level: पवना धरणात 46.55% पाणीसाठा; पिंपरी-चिंचवडला पावसाळ्यापर्यंत पुरेसा

उन्हामुळे साठा घटतोय; नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणात शनिवारी (दि.4) सकाळी आठपर्यंत 46.55 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तीव उन्हामुळे तसेच, पाण्याची मागणी वाढल्याने पाण्याचा साठा वेगात कमी होत आहे. हा साठा पिंपरी-चिंचवड शहराला पावसाळ्यापर्यंत म्हणजे जून महिन्यापर्यंत पुरेल इतका आहे.

मावळ तालुक्यातील पवनानगर येथील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेकडून पवना नदीवरील रावेत येथील बंधाऱ्यातून दररोज 520 एमएलडी पाणी उचलले जाते. पाण्यावर प्रक्रिया करून पिण्यायोग्य पाणी संपूर्ण शहराला पुरवले जाते. एमआयडीसीकडून 30 एमएलडी पाणी घेऊन शहरातील काही भागास पुरवले जात आहे. आंद्रा धरण पाणी योजनेअंतर्गत निघोजे येथील इंद्रायणी नदी बंधाऱ्यातून दररोज 80 ते 90 एमएलडी पाणी उचलून चिलखी जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून त्या परिसरात पुरवले जात आहे.

गेल्या सव्वासहा वर्षांपासून दोन दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. तीव उन्हामुळे पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. धरणात शनिवारी (दि.4) सकाळी आठपर्यंत 46.55 टक्के पाणीसाठा होता. त्या धरणातून पिंपरी-चिंचवड शहर, एमआयडीसी, काही नगरपालिका व ग््राामपंचयातीला पाणी दिले जाते. सध्याचा पाणीसाठा पिंपरी-चिंचवड शहराला पावसाळ्यापर्यंत पुरेल इतका आहे.

आंद्रा धरणात 53.68 टक्के साठा

आंद्रा धरणात सध्या 53.68 टक्के पाणी शिल्लक आहे. त्या योजनेतून निघोजे येथील इंद्रायणी नदी बंधाऱ्यातून 80 ते 90 एमएलडी पाणी दररोज उचलले जाते. तर, भामा आसखेड धरणात 62.37 टक्के पाणीसाठा आहे. अद्याप तो प्रकल्प पूर्ण न झाल्याने शहर 167 एमएलडी पाण्यापासून वंचित आहे. तर, मुळशी धरणात 45.24 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तेथील पाणी मुळा नदीस सोडले जाते.

नागरिकांनी पाण्याची नासाडी करू नये

शहरातील नागरिकांनी पाण्याची बचत करावी. नासाडी करू नये. पाण्याची गळती होऊ नये, या साठी नादुरुस्त नळ व जोड दुरुस्त करून घ्यावेत. आवार, अंगण, रस्ते, जिने तसेच, वाहन धुण्यासाठी पिण्याचा पाण्याचा वापर करू नये. शिल्लक पाणी दुसऱ्या दिवशी फेकून देऊ नये, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT