मिलिंद कांबळे
पिंपरी: निगडी ते चाकण या 40.926 किलो मीटर अंतराच्या तब्बल 10 हजार 383 कोटी 89 लाख रुपये खर्चाचा मेट्रोचा सुधारित आराखडा (डीपीआर) पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सादर करण्यात आला आहे. त्यावर अद्याप महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने शिक्कामोर्तब केलेले नाही. असे असतानाच निगडी ते चाकण मेट्रोला मान्यता मिळाली, मंजुरीसाठी सादर अशा पोस्ट सोशल मीडियावर प्रसारीत केल्या जात आहेत. त्यातून सत्ताधारी भाजपा आणि विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांमध्ये श्रेयवाद रंगला आहे.
निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक, रावेत, पुनावळे, वाकड, पिंपळे सौदागर, नाशिक फाटा, वल्लभनगर, इंद्रायणीनगरमार्गे चाकण या नव्या मार्गाचा डीपीआर पिंपरी-चिंचवड महापालिकेने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (महामेट्रो) बनवून घेतला आहे. त्यात एकूण 31 मेट्रो स्टेशन आहेत. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्क तसेच, चाकण औद्योगिक क्षेत्र एकमेकांशी जोडले जाणार आहे. प्रशासकीय राजवटीत त्या डीपीआरचे खासदार, आमदार तसेच, महापालिकेचे माजी पदाधिकाऱ्यांसमोर 1 सप्टेंबर 2025 ला सादरीकरण करण्यात आले. त्यात मेट्रो मार्ग नाशिक फाटा चौकातून थेट भोसरीकडे नेण्याची मागणी करण्यात आली. आवश्यकता भासल्यास भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल पाडण्यास लोकप्रतिनिधींकडून सहमती देण्यात आली होती.
त्यानंतर महामेट्रो व्यवस्थापनाकडून मेट्रोचे सुधारित डीपीआर मार्च 2026 ला महापालिकेकडे सादर करण्यात आला आहे. त्यावरून भाजपाचे आमदार तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांकडून निगडी ते चाकण मंजुरीसाठी महापालिकेस सादर, डीपीआर होणार मंजूर, शहराला मिळणार नवीन मेट्रोमार्ग अशा टॅगलाईनच्या पोस्ट सोशल मीडियावर प्रसारीत करण्यात येत आहेत. त्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व नेत्यांची छायाचित्रे वापरण्यात आली आहेत. महापालिकेने डीपीआरला अद्याप मंजुरी दिलेली नसताना श्रेय लाटण्याची इतकी घाई झाल्याबद्दल उलटसुलट चर्चा रंगली आहे. निव्वळ श्रेयवाद घेण्यासाठी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोशल मीडियावर मेट्रोच्या नवीन मार्गाचे दावे केले जात आहेत. श्रेयवादाच्या या प्रकारामुळे शहरवासीयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
भोसरीतून मेट्रो नाहीच
नाशिक फाटा चौकातून थेट भोसरीच्या दिशेने मेट्रो न्यावी, अशी मागणी महामेट्रोकडे करण्यात आली होती. मात्र, सुधारित डीपीआरमध्ये भोसरीचा समावेश करण्यात आलेले नाही. नाशिक फाटा चौकात मेट्रो आल्यानंतर ती संत तुकाराम मेट्रो स्टेशनकडे वळून, तेथून वल्लभनगर, अण्णासाहेब मगर स्टेडियम, गवळीमाता चौक, भोसरी डिस्ट्रीक्ट सेंटर, वखार महामंडळ गोदाम चौकातून जाणार आहे. तेथून पीआयईसीवरून मोशीतील भारतमाता चौकातून धावणार आहे.
मार्च महिन्यात डीपीआर सादर झाला आहे
महामेट्रोने निगडी ते चाकण या नव्या मार्गाचा सुधारित डीपीआर मार्च महिन्यात महापालिकेकडे सादर केला आहे. त्याबाबत आयुक्तांसमोर सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व गटनेत्यांसमोर डीपीआरचे सादरीकरण होईल. सर्वसाधारण सभेसमोर सादरीकरण करून मंजुरी मिळाल्यानंतर तो राज्य शासनाकडे पाठवला जाईल, असे महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाचे सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.
महापालिकेकडून डीपीआरला अद्याप मंजुरी नाही
निगडी ते चाकण सुधारित डीपीआरला पिंपरी-चिंचवड महापालिकेने अद्याप मंजुरी दिलेली नाही. त्याबाबत सर्वसाधारण सभेसमोर सादरीकरण केले जाईल. डीपीआरचा निर्णय सभागृहात घेतला जाईल, असे महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
जुन्या मार्गात कोणताही बदल नाही
निगडीतील भक्ती-शक्ती समूहशिल्प चौक येथून हा नवा मार्ग सुरू होणार आहे. तेथून निगडीतील ट्रान्सपोर्टनगर (वाहतूकनगरी), गणेशनगर, रावेतमधील मुकाई चौक, रावेत, पुनावळे गाव, पुनावळे, ताथवडे गाव, ताथवडे, भूमकर चौक, भुजबळ चौक, वाकड, विशालनगर कॉर्नर येथे जाणार आहे. तेथून पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा येथे मेट्रो मार्ग आहे. त्या चौकातून मेट्रो संत तुकाराम नगरकडे मेट्रो वळणार आहे. तेथून वल्लभनगर (वायसीएमजवळ), अण्णासाहेब मगर स्टेडियम, गवळीमाता चौक, भोसरी डिस्ट्रीक्ट सेंटर, वखार महामंडळ गोदाम चौक, पीआयईसी, मोशीतील भारतमाता चौक अशी मेट्रो धावणार आहे. तेथून पुढे चिंबळी फाटा, बर्गेवस्ती, कुरळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडी, चाकण असा मेट्रो मार्ग आहे. डीपीआरमधील जुन्या मार्गात कोणताही बदल करण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.