Lonavala Bhushi Dam Encroachment: लोणावळ्यात भुशी धरण परिसरात रेल्वेची अतिक्रमण कारवाई; स्थानिकांचा संताप

दुकाने जमीनदोस्त; पुनर्वसनाची मागणी, आज लाक्षणिक उपोषणाची हाक
Lonavala Bhushi Dam Encroachment
Lonavala Bhushi Dam EncroachmentPudhari
Published on
Updated on

लोणावळा: भुशी धरण परिसरात हंगामी स्वरूपाचा पर्यटन व्यवसाय करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी लावलेल्या दुकानांवर रेल्वे प्रशासनाकडून आज मोठ्या फौज फाट्यामध्ये अतिक्रमण कारवाई करण्यात आली. भुशी धरण हे रेल्वे प्रशासनाच्या मालकीचे आहे. तसेच धरणाच्या खालील भागदेखील रेल्वे प्रशासनाच्या मालकीचा आहे. या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी कोणतेही पक्के बांधकाम अथवा लोखंडी बांधकाम न करता केवळ बांबूचे शेड उभे करत पावसाळी पर्यटनाची दुकाने उभी केली होती. मात्र, त्या दुकानांवरदेखील रेल्वे प्रशासनाकडून मनुष्यबळाचा वापर व जेसीबी यंत्राचा वापर करत दुकाने तोडण्यात आली. रेल्वे पोलिस व लोणावळा शहर पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी संरक्षणासाठी उपस्थित होता.

Lonavala Bhushi Dam Encroachment
Pimpri PMPML AC Bus Demand: पिंपरी-चिंचवडमध्ये वाढत्या उन्हामुळे एसी बसला मोठी मागणी

या परिसरामध्ये व्यवसाय करणारे स्थानिक नागरिक हे गेले तीन पिढ्यांपासून म्हणजेच 60 ते 70 वर्षांपासून या ठिकाणी चहा, वडापाव, भजी विक्रीचा व्यवसाय करतात. केवळ व्यवसायच नाही तर भुशी धरणावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी देखील हेच व्यावसायिक घेत असतात. मागील वर्षी रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी व्यवसायिकांच्या पक्क्या दुकानांवर कारवाई करत ती दुकाने जमीनदोस्त केली होती. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपाची दुकाने लाकडांचा व बांबूचा उपयोग करत उभी करण्यात आली होती. त्या दुकानांवर देखील पुन्हा कारवाई झाल्याने स्थानिक व्यवसायिकांनी संताप व्यक्त केला आहे. या भागातील स्थानिक नगरसेवक व सार्वजनिक आरोग्य समितीचे सभापती धनंजय काळोखे, सोनाली संभाजी मराठे, प्रियंका किशोर कोंडे यांनी स्थानिकांच्या पाठीशी उभे राहत या ठिकाणी कारवाईला मोठा विरोध दर्शविला. मात्र मोठा पोलिस फौज फाटा व कर्मचारी याच्या सहाय्याने रेल्वे विभागाने दुकाने पडण्यास सुरुवात केली. अखेर स्थानिक नगरसेवकांच्या विनंतीला मान देत व्यावसायिकांना त्यांची दुकाने काढून घेण्यासाठी सायंकाळी चार वाजेपर्यंत वेळ देण्यात आला. त्यानुसार, व्यावसायिकांनी आपली दुकाने नुकसान टाळण्यासाठी काढून घेतली आहेत.

Lonavala Bhushi Dam Encroachment
PMRDA Hoarding Rules: पीएमआरडीएचा मोठा निर्णय; आकाशचिन्हे विभाग स्थापन, अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा इशारा

स्थानिकांना दुकाने उपलब्ध करून द्या

मागील 60 ते 70 वर्षांपासून या भागातील स्थानिक रहिवासी पर्यटनस्थळ असलेल्या भुशी धरण परिसरामध्ये आपला व्यवसाय करत आहेत. रेल्वे प्रशासनाने भुशी धरणाचा परिसर विकसित करत या स्थानिक व्यावसायिकांना या ठिकाणी दुकाने उपलब्ध करून द्यावीत व त्यांचे व्यावसायिक पुनर्वसन करावे. भुशी धरणाच्या परिसरामध्ये पर्यटकांना जाण्यासाठी योग्य प्रकारचे रस्ते नाहीत. अतिशय खराब रस्त्यावरून या ठिकाणी जावे लागते. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देत हा सर्व परिसर विकसित करावा. या ठिकाणी रोजगारासाठी स्थानिकांना दुकाने उपलब्ध करून द्यावीत. हंगामी स्वरूपामध्ये ती दुकाने स्थानिक व्यावसायिक भाडेतत्त्वावर घेऊन आपला उदरनिर्वाह करतील. मात्र, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल अशी कोणतीही कारवाई रेल्वे प्रशासनाने करू नये, असे धनंजय काळोखे म्हणाले.

Lonavala Bhushi Dam Encroachment
Pimpri Crime: चाकण हादरले! आई आणि प्रियकराने 6 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार

आरपीआयकडून कारवाईबाबत नाराजी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनीदेखील या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या स्थानिक नागरिकांवर अशा पद्धतीने रेल्वे प्रशासनाने कारवाई करू नये. मागील वर्र्षीदेखील केलेल्या कारवाईनंतर या ठिकाणी स्थानिकांचे व्यावसायिक पुनर्वसन करावे, अशी मागणी लोणावळा शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी केली होती. आतादेखील तिच मागणी आहे. आम्ही सर्वपक्षीय नेतेमंडळी हे स्थानिक व्यवसायिकांच्या पाठीशी असून, रेल्वे प्रशासनाकडे या प्रश्नाबाबत पाठपुरावा करत रेल्वे प्रशासनाने ज्या पद्धतीने दुकाने बांधत ती भाडेतत्त्वावर दिली आहे, त्याच तत्त्वाला अनुसरून भुशी धरण या ठिकाणीदेखील दुकानांची निर्मिती करत ती येथे व्यवसाय करत असलेल्या स्थानिकांना भाडेतत्त्वावर उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. याकरिता मुंबई व दिल्ली या दोन्ही ठिकाणी रेल्वे बोर्डाकडे नेतेमंडळींना एकत्र करत पाठपुरावा करू असेदेखील त्यांनी म्हटले आहे. नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे व इतर नगरसेवकदेखील कारवाईला विरोध करण्यासाठी व स्थानिकांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते.

Lonavala Bhushi Dam Encroachment
Pimpri Chinchwad 52 Crore Bill Scam: पिंपरी-चिंचवड महापालिकेत 52 कोटींचा घोटाळा? चौकशी समितीची स्थापना

प्रशासनाचे खासदार, आमदारांकडे दुर्लक्ष

स्थानिक व्यावसायिकांवर कारवाई करू नये, या मागणीसाठी मावळचे आमदार सुनील शेळके, खासदार श्रीरंग बारणे हे रेल्वे व्यवस्थापक व इतर अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधत होते. मात्र, रेल्वे प्रशासनाने कोणताही सकारात्मक प्रतिसाद अथवा कारवाई थांबविण्याबाबत कोणतीही सूचना अतिक्रमण विरोधी पथकाला न दिल्यामुळे अखेर ही कारवाई करण्यात आली. तीन महिन्यांपूर्वी या ठिकाणच्या व्यावसायिकांना दुकाने काढून घेण्याबाबतच्या सूचना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. तेव्हापासून स्थानिक लोकप्रतिनिधी हे रेल्वे व्यवस्थापक यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न करत होते, मात्र प्रत्येक वेळेस तांत्रिक कारणांमुळे ही भेट होऊ शकली नाही, असे उत्तर मिळाले.

कारवाईविरोधात आज लाक्षणिक उपोषण

रेल्वे प्रशासनाकडून भुशी धरण परिसरातील स्थानिक व्यावसायिकांवर केलेल्या अतिक्रमण कारवाईच्या विरोधात 10 एप्रिल रोजी लोणावळा शहरामध्ये लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. भुशी धरण हे पर्यटनाचे महत्त्वाचे ठिकाण असून, या ठिकाणी स्थानिक नागरिक हंगामी व्यवसाय करतात. त्यामधून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो व भुशी धरण परिसरामध्ये फिरायला येणाऱ्या पर्यटकांना चहा, वडापाव, भजी यासारख्या पदार्थांचा आस्वाद पाण्यामध्ये भिजत असताना घेता येतो. मात्र रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेली कारवाई ही निषेधार्थ असल्यामुळे या कारवाईचा निषेध नोंदविण्यासाठी हे उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक धनंजय काळोखे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news