पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारात महिनाभर उमेदवार व कार्यकर्त्यांनी प्रत्येक भाग पिंजून काढला. प्रत्येक घर, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. प्रचाराच्या सर्व पारंपरिक व अपारंपरिक साधनांचा वापर करून विजय खेचून आणण्याचा प्रयत्न झाला.
मात्र, निकालानंतर अनेक उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. काहींना मतमोजणीच्या फेऱ्यांतील मताधिक्याच्या चढ-उताराने अक्षरशः घाम फुटला आहे. कोणत्या भागात मतदान घटले त्यांचा शोध बूथनिहाय मतदान तक्तांनुसार घेण्यात येत आहे. त्यातून कोणी गद्दारी केली याचा शोध लावला जात आहे.
कोणत्या भागातून मतदान घटले त्याचे उत्तर शोधण्यासाठी आता बूथनिहाय आकडेवारीचा बारकाईने अभ्यास सुरू झाला आहे. नेमके कुठे मत कमी पडली. कोणत्या भागात अपेक्षित मतदान झाले नाही. दगा-फटका कुठे झाला, याचा किस काढला जात आहे. मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी घरभेटी, प्रचारफेऱ्या, कार्यकर्त्यांची फौज व विविध स्वरूपातील रसद यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. तरीही अल्प मतांनी पराभव स्वीकारावा लागलेल्या उमेदवारांमध्ये एकच चर्चा आहे, मतदान नेमके कुठे कमी पडले.
पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवलेल्या उमेदवारांतील मतांचा फरक पाहता काही भागांत मतदान कमी झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. यासाठी काही उमेदवारांनी आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांकडून ठराविक गल्ल्यांतील घराघरांत चौकशी सुरू केली आहे. कोणत्या घरातून मतदान झाले, कोणाला झाले आणि किती वाजता झाले, याचा ताळमेळ घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
प्रत्येक गल्लीतून किती, कसे मतदान झाले यांचा हिशोब सुरू
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांप्रमाणेच महापालिका निवडणुकीतही मतदान केंद्रनिहाय सविस्तर आकडेवारी मतमोजणीनंतर उपलब्ध झाली आहे. कोणत्या केंद्रावर किती मतदान झाले, त्यातील आपला वाटा किती, प्रतिस्पर्ध्यांना किती मते मिळाली, पॅनलमधील इतर उमेदवारांचा प्रभाव किती, याचा सखोल अभ्यास सुरू आहे. रसद देऊनही नेमक्या कुठल्या परिसरातून अपेक्षित मतदान झाले नाही, हे ठरवणे पराभूत उमेदवारांसाठी अवघड ठरत आहे. काही ठिकाणी मतदारांनी मतदानच केले नाही का, कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचले नाहीत की पोहोचूनही मतदारांच्या अपेक्षांची पूर्तता झाली नाही, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. कोणी गद्दारी केली. तर, कोणी प्रामाणिकपणे काम केले, याचा कसून शोध घेतला जात आहे.