पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेबुवारी 2017 नंतर आता होत आहे. त्यानंतर मतदार संख्या 5 लाख 21 हजार 802 ने वाढली आहे. आता, शहराची एकूण मतदार संख्या 17 लाख 13 हजार 891 इतकी आहे. मात्र, एक जुलैनंतर नोंद झालेल्या नवमतदारांना आगामी महापालिका निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. (Latest Pimpri chinchwad News)
शहराच्या सन 2011 च्या जनगणनेनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यावेळेस शहराची लोकसंख्या 17 लाख 27 हजार 692 इतकी होती. आता, ही लोकसंख्या 30 लाखांच्या पुढे गेल्याचा अंदाज आहे. तसेच, मतदार संख्येतही मोठी वाढ झाली आहे.
फेबुवारी 2014 आणि फेबुवारी 2017 ला झालेल्या निवडणुकीत सन 2011ची लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आली होती. फेबुवारी 2017 नंतर आता होत असलेल्या निवडणुकीसाठीही सन 2011च्या जनगणनेनुसार प्रभागरचना करण्यात आली आहे. गेल्या पावणेनऊ वर्षांत शहरातील 5 लाख 21 हजार 802 इतकी मतदार संख्या वाढली आहे. शहराची एकूण मतदार संख्या 17 लाख 13 हजार 891 इतकी झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी महापालिका निवडणुकीसाठी ग््रााह्य धरली जात आहे. त्यानुसार 32 प्रभागाची मतदार यादी फोडण्यात येत आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून तब्बल 1 हजार 800 अधिकारी व कर्मचारी त्या कामात व्यस्त आहेत.
विरोधकांची निवडणूक आयोगावर टीका
निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे 1 जुलैनंतर नोंदणी झालेल्या नवमतदारांना महापालिका निवडणुकीत मतदान करता येणार नाही. 2 जुलै 2025 ते जानेवारी 2026 असे सात महिन्यांत नोंद झालेल्या हजारो नवमतदारांना निवडणुकीच्या मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरात राहत असला तरी, त्या नवमतदारांना महापालिकेसाठी मतदान प्रकियेत भाग घेता येणार नाही. त्यावरुन विरोधक निवडणूक आयोगावर टीका करत आहेत.
मतदार वाढल्याने उमेदवारांचा लागणार कस महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून प्रभागनिहाय मतदार यादी फोडण्याचे काम वेगात सुरू आहे. विधानसभेची मतदार यादी फोडून 1 ते 32 अशी प्रभागनिहाय तयार केली जात आहे. त्या 32 मतदार याद्या महापालिकेकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. एका प्रभागात मतदार संख्या 45 ते 55 हजार इतकी असणार आहे. मोठ्या संख्येने वाढलेल्या मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांना कसरत करावी लागणार आहे. त्यासाठी त्यांना अधिकची मेहनत घ्यावी लागणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून 1 जुलै 2025 पर्यंतची पिंपरी, चिंचवड, भोसरी व भोर विधानसभेची मतदार यादी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार विधानसभानिहाय मतदार यादी फोडून एकूण 32 प्रभागाची मतदार यादी तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. यादी तयार करण्याचे काम 5 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर 6 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत.सचिन पवार, उपायुक्त, निवडणूक विभाग, महापालिका
फेबुवारी 2017 च्या निवडणुकीतील मतदार संख्या : 11 लाख 92 हजार 89
आगामी निवडणुकीसाठी मतदार संख्या : 17 लाख 13 हजार 891
एका प्रभागात असणार : 45 ते 55 हजार मतदार