पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना जाहीर झाली आहे. त्यानंतर प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी महापालिकेत मतदार यादी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. महापालिकेच्या 32 प्रभागाप्रमाणे मतदार यादी फोडणे, मतदान केंद्रानुसार मतदार यादी अंतिम केली जाणार आहे. त्याला राज्य निवडणूक विभागाकडून मंजुरी घेण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे.(Latest Pimpri chinchwad News)
महापालिकेची चार सदस्यीय 32 प्रभागांची रचना अंतिम झाली आहे. इच्छुकांचे लक्ष आता, आरक्षण सोडतीकडे लागले आहे. दुसरीकडे निवडणूक विभागाने महापालिका निवडणुकीची तयारी वेगात सुरू केली आहे. प्रभाग रचनेतंनर आरक्षण सोडत व प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करणे हा महत्वाचा टप्पा आहे. त्याचे काम सुरू झाले आहे.महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र मतदार यादी कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षासाठी स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, राजीव घुले यांच्यासह 43 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या अंतिम झालेल्या प्रभाग रचनेनुसार 32 प्रभागांचा समावेश आहे. या प्रभागांची स्वतंत्र मतदार यादी तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाने महापालिकांना मतदार यादीचे विशेष संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. विधानसभा मतदारसंघातील भाग क्रमांकानुसार यादी डाऊनलोड करून मुख्य मतदार यादी तयार केली जाईल. नंतर प्रभागनिहाय मतदार यादी तयार केली जाणार आहे. निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी मुख्य मतदार यादी म्हणून वापरण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, ज्यांची नावे 1 जुलै 2025 पर्यंत नोंदवलेली आहेत, त्याच मतदारांना आगामी महापालिका निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे. त्यानंतरच्या मतदारांना मतदान करता येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
एका प्रभागात 45 ते 55 हजार मतदार
पिंपरी, चिंचवड, भोसरी व भोर विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी फोडून 1 ते 32 अशी प्रभागात ती विभागली जाईल. त्या 32 मतदार याद्या महापालिकेकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सन 2017 मधील निवडणुकीत एका प्रभागात किमान 26 हजार आणि कमाल 49 हजार इतकी मतदार संख्या होती. मात्र, मतदारांची संख्या वाढली आहे. पिंपरी विधानसभा मतदार संघात 3 लाख 99 हजार 800, चिंचवड मतदारसंघात 6 लाख 79 हजार 858 आणि भोसरी मतदारसंघात 6 लाख 29 हजार 129 असे एकूण 17 लाख 8 हजार 787 मतदार संख्या आहेत. यंदा एका प्रभागात 45 हजारांपेक्षा अधिक मतदार असणार आहेत. तर, काही प्रभागांतील मतदार संख्या 55 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
मतदार यादी कक्षाकडून काम सुरू
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंतिम प्रभाग रचनेप्रमाणे 32 प्रभागांची प्रभागनिहाय यादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या संदर्भात निवडणूक विभागाने विविध सूचना केल्या आहेत. त्या प्रमाणे मतदार यादी कक्षामार्फत काम करण्यात येत आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले.
प्रभागनिहाय मतदार यादी बनविण्याचे वेळापत्रक
एक जुलै 2025 पर्यंतच्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करणे - 14 ऑक्टोबर
हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे - 6 नोव्हेंबर
प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करून घेण्याची मुदत- 6 ते 14 नोव्हेंबर
प्रारुप मतदार यादीवर दाखल हकरतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करणे - 28 नोव्हेंबर
मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करणे - 4 डिसेंबर
मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे - 10 डिसेंबर