

पिंपरी : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या विक्रीत स्पर्धा वाढली आहे. दरम्यान, थेरगाव येथील काही तरुणांनी ‘मार्केटिंग’चा एक आगळावेगळा आणि कायदेशीर मर्यादा ओलांडणारा मार्ग निवडला आहे. अंडरवर्ल्ड स्टाईल टोळी युद्धाचा बनावट प्रसंग तयार करून, त्यावर आधारित एक ‘थरारक रील’ तयार केली आणि ती सोशल मीडियावर टाकताच काही तासांतच व्हायरल झाली. त्यानंतर वाकड पोलिसांनी संबंधित तरुणाची उचलबांगडी करून त्याचा माफीनामा व्हायरल केला. (Latest Pimpri chinchwad News)
दुकानाची जाहिरात व्हावी यासाठी तरुणाने बनवलेल्या रीलमध्ये थेरगावमध्ये खुलेआम घडलेला प्रकार! असे कॅप्शन देण्यात आले होते. त्यात काळ्या कपड्यातील युवक, चेहऱ्यावर गुंडांचे हावभाव आणि हातात प्लास्टिकच्या पिस्तुलांसह बनावट गोळीबाराचे दृश्य दाखवले आहे. शेवटी या रीलचा शेवट फटाक्यांच्या स्टॉलच्या जाहिरातीने होतो. थेरगाव परिसरातील काही नागरिकांनी अर्धवट रील पाहून ती खरी घटना असल्याचे समजून घेतले. त्यामुळे काही वेळातच थेरगावमध्ये गोळीबार झाला अशी अफवा पसरली.
वस्तुस्थिती समजल्यानंतर मात्र सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या, फटाक्यांची जाहिरात करायची, पण गुन्हेगारी दाखवून प्रसिद्धी मिळवणे योग्य नाही! काहींनी या कृतीला गुन्हेगारी संस्कृतीचे ग्लॅमरायझेशन म्हटले आहे. वाकड पोलिसांनी या रीलचा तपास सुरू करत ‘रीलस्टार’ तरुणाची उचलबांगडी केली. त्याला कडक समज देण्यात आली आणि त्याच्याकडून सार्वजनिक माफी मागणारी नवीन रील तयार करून ती सोशल मीडियावर टाकण्यात आली.
‘भाईगिरी’ रील्सवर पोलिसांचे लक्ष अशा प्रकारची मस्ती खपवून घेतली जाणार नाही. गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे रील्स बनवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. पिंपरी चिंचवड पोलिसांनी यापूर्वीही सोशल मीडियावर गुन्हेगारीचे प्रदर्शन करणाऱ्या तथाकथित ’भाई’ मंडळींना वठणीवर आणले आहे.
शत्रुघ्न माळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलिस ठाणे.