

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत नियोजित रिंग रस्त्याच्या पहिल्या टप्प्यातील मोजणी पूर्ण झाली. मात्र, पुढील भूसंपादनासाठी तीन गावांनी विरोध दर्शवला आहे. परिणामी, गेल्या अनेक महिन्यांपासून मोजणी रखडली आहे. त्यामुळे रिंग रस्त्याच्या पुढील कामास अडथळा निर्माण झाला आहे. दरम्यान, याविषयी जिल्हाधिकारी कार्यालय, पीएमआरडीए आणि ग्रामस्थांच्या बैठका होत असून, त्यातून सकारात्मक मार्ग काढला जाईल, असे पीएमआरडीएकडून सांगण्यात येत आहे.(Latest Pimpri chinchwad News)
पुणे शहर, परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दोन रिंग रस्ते प्रस्तावित आहेत. त्यापैकी एका रिंग रस्त्याचे काम हे राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे. तर, त्याला जोडणारा दुसऱ्या रिंग रस्त्याचे काम पीएमआरडीए करणार आहे. त्या हद्दीत हा 83 किलो मीटर लांबीचा तर, 65 मीटर रुंदीचा रिंग रस्ता करण्यात येणार आहे. त्यासाठी 115 हेक्टर जमिनीचे संपादन आवश्यक आहे. त्यानुसार रस्त्याचे टप्पे आखण्यात आले असून, पीएमआरडीएच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय हे भूसंपादन करीत आहेत.
राज्य रस्ते विकास महामंडळ करीत असलेला रिंग रस्ता हा सोळू गावपर्यंत आहे. सोळू ते निरगुड या दरम्यानची मोजणी पूर्ण झाली आहे. त्या ठिकाणी पीएमआरडीएचा रिंग रस्ता जोडणार आहे. त्यामुळे या गावातील संपादन करण्यात येणार होते.
रिंग रस्त्याबाबतच्या मोजणीबबात कार्यवाही सुरू आहे. स्थानिक रहिवासी, शेतकरी यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल.
कल्याण पांढरे, उपजिल्हाधिकारी, पुणे
या रिंग रस्त्याच्या अंतर्गत आंबेगाव खुर्द, भिलारेवाडी, मांगडेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, वडाचीवाडी, पिसोळी, सोळू, निरगुडी, वडगाव शिंदे या गावांची मोजणी पूर्ण झााली आहे. तर, येवलेवाडी, जांभुळवाडी आणि कदमाकवस्ती अशा सुमारे 45 हेक्टर भूसपांदन बाकी आहे.