Pimpri Chinchwad Municipal Corporation Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Encroachment Removal: पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेच्या ६३ जागा अतिक्रमणमुक्त होणार; आयुक्तांचे कठोर आदेश

आतापर्यंत ५० टक्के जागा ताब्यात; नोव्हेंबरअखेर कुंपण घालण्याचे नियोजन, विरोध करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या हजारो जागा आहेत. त्या जागा तात्काळ ताब्यात घेऊन सुरक्षा कुंपण न केल्याने अनेक रिकाम्या जागांवर अतिक्रमण झाले आहे. त्यापैकी तब्बल 63 जागा प्राधान्याने अतिक्रमणमुक्त करून त्याला कुंपण घालण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्यानंतर प्रशासन कामाला लागले आहे. आतापर्यंत 50 टक्के जागा ताब्यात आल्या असून, उर्वरित सर्व जागा नोव्हेंबर महिन्याअखेरपर्यंत ताब्यात घेण्याचा अ‍ॅक्शन प्लान आखण्यात आला आहे. त्यासाठी प्रशासनाकडून कठोर भूमिका घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कारवाईस विरोध करणार्‍यांवर प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

महापालिकेच्या संपूर्ण शहरात सुमारे दोन हजार जागा व मालमत्ता आहेत. आरक्षित असलेल्या जागांपैकी केवळ 35 टक्के जागा महापालिकेच्या ताब्यात आले. टीडीआर, रक्कम अशा माध्यमातून महापालिकेकडून जागामालकांस नुकसान भरपाई दिल्यानंतरही त्या जागांवर अतिक्रमण झाल्याचे चित्र आहे. नुकसान भरपाईची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाकडून तातडीने प्रक्रिया पूर्ण न करण्यात आल्याने अनेक जागांवर अतिक्रमण झाले आहे. पुढे त्या जागांकडे प्रशासनाकडून डोळे झाक करण्यात आली.

या संदर्भात आयुक्त डॉ. विजय सूर्यंवशी यांनी ठोस भूमिका घेतली आहे. महापालिकेने आरक्षित केलेल्या तसेच, नुकसान भरपाई दिलेल्या शहरातील सर्व जागा तातडीने ताब्यात घेऊन त्याला सुरक्षा कुंपण घालण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांना दिले आहेत. ते काम प्राधान्याने पूर्ण करण्याची ताकीद दिली आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 63 मोठ्या जागांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार, क्षेत्रीय अधिकार्‍यांकडून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जात आहे. आत्तापर्यंत 50 टक्के जागा ताब्यात आल्या आहेत. उर्वरित सर्व जागा या महिन्याअखेरपर्यंत ताब्यात घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार, ठोस कारवाई केली जाणार आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले. ती मोहीम पूर्ण झाल्यानंतर शहरातील सर्व आरक्षित जागा ताब्यात घेण्याची कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी संबंधित विभागांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अतिक्रमण हटविण्यासाठी कसरत

महापालिकेने नुकसान भरपाई देऊन जागा मालकांकडून त्या जागा ताब्यात घेतल्या आहेत. मात्र, भरपाई दिल्यानंतर जागा ताब्यात घेण्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने त्या जागांवर मूळ जागामालकांनीच अतिक्रमण केल्याचे चित्र आहे. त्यामध्ये प्रतिष्ठीत नागरिकांचा समावेश आहे. त्यांच्याकडून जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिका प्रशासनाला बरीच कसरत करावी लागणार आहे. मात्र, आयुक्तांनी ठोस भूमिका घेतल्याने त्या जागा कोणत्याही परिस्थितीत क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकांकडून ताब्यात घेण्यात येणार आहेत.

त्या जागांवर गृहप्रकल्प, मैदान, शाळा, दवाखाना, उद्यानांचे आरक्षण

आकुर्डीत विसंगत उद्योग, रावेतमध्ये बेघरांसाठी घरे, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे, स्मशानभूमी, प्राथमिक शाळा, पाण्याची टाकी, किवळेत बसस्थानक, मोशीत जकात नाका, शॉपींग सेंटर, वाहनतळ, टाऊन हॉल, सुपर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह कम कमर्शिअल कॉम्प्लेक्स, प्राथमिक शाळा, स्टेडियम, चर्‍होलीत उद्यान, चोवीसावाडीत बेघरांसाठी घरे, दुकान केंद्र व मार्केट, वाहनतळ, सांस्कृतिक केंद्र किंवा वाचनालय, बोपखेलमध्ये दवाखाना व प्रसूतिगृह, जकात नाका, भोसरीत पोलिस चौकी व दवाखाना, प्राथमिक शाळा व सांस्कृतिक केंद्र, महापालिका उपयोगासाठी, डुडुळगावात जकात नाका, खेळाचे मैदान, चिखलीत माध्यमिक शाळा, तळवडेत उद्यान किंवा प्राणी संग्रहालय, सांगवीत प्राथमिक शाळा, पिंपळे गुरवमध्ये उद्यान आणि काळेवाडीत खेळाचे मैदान असे आरक्षण आहे.

..या आहेत त्या जागा

आकुर्डीतील एक, वाल्हेकरवाडीतील दोन, रावेतमधील आठ, किवळेमधील एक, मोशीतील सोळा, चर्‍होलीतील एक, चोवीसावाडीतील अकरा, बोपखेलमधील एक, भोसरीतील तीन, डुडुळगावमधील दोन, चिखलीतील दोन, तळवडेमधील एक, सांगवीतील अकरा, पिंपळे गुरवमधील एक, काळेवाडीतील एक

अतिक्रमण करणार्‍यांवर गुन्हे दाखल करून, भाडेही वसूल करावे

महापालिकेने रितसर नुकसान भरपाई दिल्यानंतरही मूळ जागामालकांनी त्या जागांवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण केल्याचे चित्र शहरभरात आहे. प्रशासनानेही त्या जागा ताब्यात घेण्यासाठी कसोशीने प्रयत्न केलेले नाहीत. त्या जागांवर व्यवसाय तसेच, पत्राशेड टाकून जागामालकांनी अनेक वर्षांपासून मोठे उत्पन्न खिशात घातले आहे. त्यामध्ये प्रतिष्ठीतांचा समावेश आहे. त्यांच्याकडून अतिक्रमण केल्याच्या दिवसापासूनचे बाजारभावानुसार भाडे वसूल केले जावे. तसेच, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. जागा ताब्यात घेण्यास विलंब करणार्‍या नगर रचना विभागासह क्षेत्रीय अधिकार्‍यांवर कारवाई केली जावी, असे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी सांगितले.

आतापर्यंत 50 टक्के अतिक्रमण हटवून जागा ताब्यात घेण्यात यश

आयुक्तांनी आदेश दिल्यानुसार शहरातील 63 जागांवरील अतिक्रमण हटवून त्या जागेस सुरक्षा कुंपण घालण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सर्व दहा क्षेत्रीय अधिकार्‍यांकडून त्याबाबत अंमलबजावणी केली जात आहे. आत्तापर्यंत एकूण 50 टक्के अतिक्रमण हटवून कुंपन घालण्यात आले आहे. नोव्हेंबर महिनाअखेरपर्यंत सर्व साठ जागा 100 टक्के महापालिकेच्या ताब्यात असतील, असे नियोजन केले आहे, असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT