

पिंपरी: शहरात महापालिकेकडून दरवर्षी उद्दिष्ट ठरवून वृक्षारोपणाची मोहिम राबविली जाते. पर्यावरण संवर्धनाचा गाजावाजा केला जातो; मात्र दुसरीकडे लावलेल्या झाडांच्या संवर्धनाचाच महापालिका प्रशासनाला विसर पडल्याचे चित्र दिसून येत आहे. कासारवाडी-पिंपळे गुरव रस्त्यावर ड्रेनेज आणि स्टॉर्म वॉटर लाईनच्या झाकणांची वारंवार दुरुस्ती केली जाते. मात्र, दुरुस्तीनंतर जुनी झाकणे आणि लोखंडी रिंग चक्क रस्त्यालगतच्या झाडांच्या मुळांशी, कुंड्यांच्या परिसरात टाकून दिल्याचे निदर्शनास येत आहे. झाडे जगविण्याच्या घोषणा करणाऱ्या प्रशासनाकडूनच झाडांच्या परिसरात भंगाराचा पसारा केला जात असेल, तर वृक्षसंवर्धनाच्या दाव्यांचे करायचे काय? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दुरुस्ती वारंवार, जुन्या साहित्याची विल्हेवाट कुठे?
कासारवाडी-पिंपळे गुरव रस्त्यावर ड्रेनेज आणि स्टॉर्म वॉटर लाईनची झाकणे वारंवार तुटत असल्याने त्यांच्या दुरुस्तीची कामे केली जातात. नवीन झाकणे बसविताना जुनी झाकणे आणि त्यांचे लोखंडी रिंग बाजूला काढले जातात. मात्र, हे साहित्य नियमानुसार उचलून नेण्याऐवजी रस्त्यालगतच टाकून दिल्याचे चित्र दिसत आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाले म्हणजे जबाबदारी संपली का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
‘झाडे वाचवा’चे धढे भिंतीवरच
रस्त्यावर एका बाजूला ‘झाडे वाचवा, हिरवाई जपा’ असे पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणाऱ्या भिंती दिसतात. मात्र, याच संदेशांच्या समोरच झाडांच्या मुळांशी ड्रेनेजची जुनी झाकणे आणि लोखंडी रिंग टाकून दिल्याचे चित्र आहे. ज्या ठिकाणी हिरवाई जपण्याचे संदेश दिले जातात, त्याच ठिकाणी झाडांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा विरोधाभास समोर आला आहे. पर्यावरण जपण्याचे संदेश देणाऱ्या महापालिकेनेच त्याच्या अंमलबजावणीकडे पाठ फिरविल्याचे या प्रकारातून स्पष्ट होत आहे.
वृक्षारोपणाचा उत्साह; संगोपनाचा मात्र विसर!
महापालिकेकडून दरवर्षी वृक्षारोपण मोहिमा राबविल्या जातात. झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा, असे संदेश दिले जातात. मात्र, लावलेल्या झाडांची नियमित देखभाल, त्यांच्या परिसराची स्वच्छता आणि संरक्षण याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या प्रकारातून दिसून येते. झाडांच्या मुळांशीच जुन्या साहित्याचा पसारा असेल, तर वृक्षसंवर्धनाच्या घोषणा केवळ कागदावरच राहणार का? संबंधित विभागाने तातडीने हे साहित्य हटवून झाडांच्या परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अर्बन स्ट्रीटच्या सुशोभीकरणावर भंगाराचे सावट!
अर्बन स्ट्रीटअंतर्गत रस्त्यालगत झाडे लावून परिसर सुशोभित करण्यात आला आहे. झाडांच्या संगोपनासाठी कुंड्या आणि मोकळ्या जागाही तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, याच परिसरात जुन्या ड्रेनेजची झाकणे आणि लोखंडी रिंग टाकून दिल्याने सुशोभीकरणाच्या कामाचे विद्रूपीकरण होत आहे. झाडांच्या मुळांजवळ अशा वस्तू टाकल्याने त्यांच्या वाढीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. मग लाखो रुपये खर्चून केलेल्या सुशोभीकरणाचा उपयोग काय, असा सवाल नागरिक करीत आहेत.
महापालिका एकीकडे झाडे लावण्यासाठी आणि हरित शहर निर्माण करण्यासाठी मोठा खर्च करते. मात्र, त्याच झाडांच्या मुळाशी जुन्या ड्रेनेजची झाकणे आणि लोखंडी रिंग टाकून दिली जात असतील, तर वृक्षसंवर्धनाचा नेमका उपयोग काय? संबंधित विभागाने तातडीने हा पसारा हटवून झाडांचे संरक्षण करावे आणि अशा प्रकारांना जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी.
सचिन ऐवले, स्थानिक नागरिक