पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी भोसरीतील भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. तर, उपमहापौर पदासाठी भाजपचे नगरसेवक शीतल शिंदे यांनी नकार दिल्याने नगरसेविका शर्मिला बाबर यांनी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार) पक्षाकडून नगरसेविका वैशाली काळभोर यांनी अर्ज दाखल केला आहे. महापौर व उपमहापौराची अधिकृत निवड शुक्रवारी (दि. 6) होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत होणार आहे.
भाजपचे 84 विजयी
महापालिकेत फेबुवारी 2017 ला भाजपची पहिल्यांदा सत्ता तर, जानेवारी 2026 च्या निवडणुकीत भाजपची दुसऱ्यांदा सत्ता आली. तब्बल 9 वर्षांनंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता काबीज केली आहे. 128 पैकी भाजपाचे 84 नगरसेवक विजयी झाले आहेत. महापौरपद हे सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाले आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी शुक्रवारी (दि. 6) सकाळी अकराला विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. त्या दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज महापालिकेतील नगर सचिव विभागात सोमवारी (दि. 2) दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत स्वीकारण्यात आले. महापौर पदासाठी एक तर, उपमहापौर पदासाठी दोन अर्ज दाखल करण्यात आले आहे.
महापौर पदासाठी सत्ताधारी भाजपकडून भोसरीतील धावडेवस्ती प्रभाग क्रमांक 6 मधून सलग दुसऱ्यांदा बिनविरोध म्हणून निवडून आलेले रवी लांडगे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून प्रशांत शितोळे व अनुमोदक म्हणून अभिषेक बारणे यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादी काँग््रेासकडून अर्ज भरण्यात आला नाही. या वेळी आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे, सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, ॲड. नितीन लांडगे, अभिषेक बारणे, अनुप मोरे यांसह पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
उपमहापौर पदासाठी सलग तीनवेळा निवडून आलेले निष्ठावंत गटाचे शीतल शिंदे यांचे नावे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केले होते. शिंदे यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्यास नकार देत ते महापालिका भवनातून निघून गेले. त्यांच्या जागी ऐनवेळी निगडी, प्राधिकरण, आकुर्डी प्रभाग क्रमांक 15 मधील भाजपच्या निष्ठावंत नगरसेविका शर्मिला बाबर यांनी उपमहापौर पदाचा उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून अनुराधा गोरखे व अनुमोदक म्हणून नमता लोंढे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तर, उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग््रेासच्या आकुर्डी गावठाण, चिंचवड स्टेशन, मोहननगर प्रभाग क्रमांक 14 च्या नगरसेविका वैशाली काळभोर यांनी अर्ज दाखल केला. त्यांना सूचक म्हणून प्रमोद कुटे व अनुमोदक म्हणून अरुणा लंगोटे यांनी त्यांच्या अर्जावर सही केली आहे. या वेळी नगरसेवक प्रमोद कुटे, नगरसेविका अरुणा लंगोटे, विशाल वाकडकर आदी उपस्थित होते. महापालिकेचे नगर सचिव मुकेश कोळप यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारले. ते तीनही अर्ज वैध ठरले आहेत.
शुक्रवारी होणार महापौर, उपमहापौर पदावर शिक्कामोर्तब
महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीसाठी शुक्रवारी (दि. 6) सकाळी अकराला पहिली विशेष सर्वसाधारण सभा महापालिकेतील यशवतंराव चव्हाण सभागृहात आयोजित केली आहे. पुणे सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा होणार आहे. प्रथम महापौरपदाची निवड होणार आहे. त्यानंतर उपमहापौर पदाची निवड केली जाणार आहे. संख्याबळ पाहता भाजपचे रवी लांडगे महापौर हे बिनविरोध महापौर होणार आहेत. तर, राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यास संख्याबळानुसार मतदान होऊन शर्मिला बाबर या उपमहापौर होतील, असे चित्र आहे.
रवी लांडगे भाजपचे चौथे महापौर ठरणार
राष्ट्रवादी काँग््रेासच्या ताब्यातील पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपने फेबुवारी 2017 च्या निवडणुकीत सत्ता काबीज केली. त्या वेळी भाजपची महापालिकेत पहिल्यांदा सत्ता आली. जानेवारी 2026 च्या निवडणुकीत भाजपची दुसऱ्यांदा सत्ता आली. गेल्या पंचवार्षिकेत भाजपचे नितीन काळजे, राहुल जाधव व उषा ढोरे हे तीन महापौर झाले आहेत. आता, रवी लांडगे हे भाजपचे चौथे महापौर होतील.
शीतल शिंदे यांनी नाकारले उपमहापौरपद
सलग तीन वेळा नगरसेवक झालेले भाजपच्या निष्ठावंत गटातील शीतल शिंदे हे महापौर पदासाठी तीव इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी महापौरपद डावलून उपमहापौरपद देण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. संताप व्यक्त करीत त्यांनी उमेदवारीअर्ज न भरता महापालिका भवन सोडले. या नाराजीनाट्यामुळे सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमोर पेच निर्माण झाला होता. अखेरच्या क्षणी नगरसेविका शर्मिला बाबर यांचे नाव उपमहापौर पदासाठी घोषित करण्यात आले. त्यांनी त्या पदासाठी अर्ज दाखल केला.
नाराज शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हे गैरहजर
महापौर पदासाठी भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हेही तीव इच्छुक होते. त्यांना महापौरपद न मिळाल्याने ते उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळेस उपस्थित नव्हते. त्यांची नाराजी व गैरहजेरीची चर्चा महापालिका भवनात सुरू होती. चिंचवड विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या विरोधात बंड केले होते. त्यामुळे त्यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.