

तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे येथे रविवारी आठवडे बाजार भरतो. यामुळे स्थानिक नागरिकांसह आजूबाजूच्या गावांना आणि वाडी वस्तीवरील नागरिकांना खरेदी विक्रीसाठी बाजारपेठ मिळत आहे. परंतु या बाजारपेठेतील समस्यांकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने दिवसेंदिवस येथील बाजार नागरिकांची डोकेदुखी ठरू लागला आहे.
या आठवडे बाजाराचे दिवसेंदिवस वाढते स्वरूप व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, ध्वनी प्रदूषण व पाकीटमार, मोबाईल चोर, यासारखी वाढती गुन्हेगारी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. स्थानिक नागरिक व व्यापारी वर्ग यांनी या आठवडे बाजाराच्या ढिसाळ नियोजना संदर्भात प्रशासनास दोषी ठरवले आहे. आठवडे बाजारचे स्वरूप पूर्णपणे पालटले आहे. राजेंद्र चौक, डाळ आळी, श्री शिवाजी टॉकीज, जिजामाता चौक, मारुती मंदिर चौक, जुन्या नगरपालिका इमारतीच्या पुढील व मागील बाजूस ते थेट जिजामाता चौक ते स्टेशन भागाला जोडणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा, स्वामी विवेकानंद शाळेसमोर अशा सर्व ठिकाणी हा बाजार भरत आहे. स्वामी विवेकानंद शाळा ते संपूर्ण गाव परिसर हा वाहतुकीच्या समस्येने त्रस्त झाला आहे. या बाजारा संदर्भात प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारचे नियोजन करण्यात येत नाही. असा थेट आरोप नागरिकांकडून व स्थानिक व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
या संदर्भात एप्रिल 2025 मध्ये व्यापारी, फेरीवाले संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व नागरिक यांची तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस यांच्यासोबत दोन ते तीन वेळा संयुक्त बैठका पार पडल्या. व या बैठकांनंतर तळेगाव दाभाडे नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तिकरित्या प्राप्त तक्रारींवर आम्ही लवकरच उपाययोजना करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर पुढील दोन आठवडे याची अंमलबजावणीही झाली. जिजामाता चौकाकडून गावात जाणारा रस्ता मोकळा ठेवणे, जुनी नगरपालिका ते संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत व्यावसायिकांना मज्जाव करणे जेणेकरून गावात येण्या जाण्यासाठी प्रत्येकी एक रस्ता मोकळा राहील. मारुती मंदिर चौक ते जिजामाता चौक हा रस्ताही मोकळा ठेवण्यात येईल जेणेकरून वाहतुकीला अडथळा येणार नाही, सर्व वाहतूक सुरळीत होईल. तसेच नथूभाऊ भेगडे प्रशालेचे प्रांगण व नगर परिषदेने उभारलेल्या पार्किंगचा उपयोग नागरिकांनी करावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. या सर्व उपाययोजनांकरिता पोलीस प्रशासन व नगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक हे दोन सत्रात काम करेल, असे आश्वासन तेव्हाचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्याकडून देण्यात आले होते.
नागरिकांच्या मागणीला केराची टोपली
बाजाराची विस्कळीत अवस्था वाहतूक कोंडी, ध्वनी प्रदूषण व वाढती गुन्हेगारी याला प्रशासनच खतपाणी घालत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे. या संदर्भात मागील सात ते आठ महिन्यांपासून व्यापारी वर्ग व नागरिक प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करीत आहेत. परंतु अद्याप नागरिकांच्या मागणीकडे प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचे सांगण्यात येत आहे.
तळेगाव दाभाडे शहरातील ऐतिहासिक बाजारपेठेत असलेला हा आठवडे बाजार तळेगाव दाभाडे शहराची शान आहे. परंतु अलीकडच्या काळात या बाजाराला आलेले स्वरूप पाहता त्वरित उपाययोजनांची गरज आहे. या संदर्भात प्रशासनाला वारंवार विनंती करून देखील यावर कुठलीच उपाययोजना करण्यात येत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
विनोद राठोड, ज्वेलर्स असोसिएशन
या संदर्भात नऊ महिन्यांपूर्वी प्रशासनासोबत झालेल्या बैठकांमध्ये ठरल्याप्रमाणे रोजचे भाजीपाला विक्रेते यांना जुन्या मार्केटमध्ये जागा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून रोजच्या वाहतूक कोंडीतून सुटका होईल. तसेच आठवडे बाजार श्री शिवाजी टॉकीज ते राजेंद्र चौक व राजेंद्र चौक ते डाळी चौक या परिसरात सोय केल्याने गावातील प्रमुख चौकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल. पोलिस प्रशासनाने मिरवणुकांवेळी बाजारपेठेत उभ्या असलेल्या गाड्यांचे फोटो काढून पावत्या पाठवतात तेवढ्याच तत्परतेने उपाययोजना केल्यास वाढती गुन्हेगारी व वाहतूक कोंडीस आळा बसेल.
किरण ओसवाल, सामाजिक कार्यकर्ते